रत्नागिरी :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना शरद पवार राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांनी मंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, प्रशांत यादव कुठेही जाऊदे त्यांना येणारा काळ उत्तर देईल. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा आमचा मानस आहे. ही निवडणूक कोणाची किती ताकद आहे हे दाखवणारी असेल, असे सामंत यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह माळनाका येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विरोधकांवर टीका करताना सामंत म्हणाले की, जनतेला दिशाभूल करून निवडणुका जिंकता येणार नाहीत. आमचे काम आणि आमची जनतेशी असलेली नाळ हीच आमची खरी ताकद आहे. सामंत यांनी पक्षाच्या आगामी रणनीतीवर भाष्य करताना शिवसेनेच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे. आगामी निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी होतील, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे मत व्यक्त केले.
निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांची समन्वय समिती आहे. त्या समितीत मी स्वतः आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी रत्नागिरी जिल्ह्यासंदर्भात आपली २ तास चर्चा झाली. मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेत भाजपचा एकही सदस्य नव्हता. रवींद्र चव्हाणना याची माहिती आहे. महायुती म्हणून मित्रपक्षांचा सन्मान ठेवला जाईल. समन्वय समितीत काय चर्चा होते, हे समिती सदस्यांनाच माहिती असते. बाहेरच्यांना त्यांची माहिती नसते. कार्यकर्त्यांचा जोश वाढविण्यासाठी नीतेश राणे यांनी स्वबळाचा नारा दिला असेल तर त्याची आपल्याला माहिती नाही. मी चारवेळा मंत्री झालो त्यामुळे कुठे काय बोलायचे याचे ज्ञान मला आहे, असा टोला सामंत यांनी राणेंना लगावला.








