इस्कॉनच्यावतीने आठवडाभर विविध कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)च्यावतीने इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने इस्कॉनच्या शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात भव्य सजावट करण्यात आली होती. आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या जन्माष्टमी महोत्सवाचा समारोप रविवारी व्यासपूजेने झाला. श्रील प्रभुपाद यांच्या प्रतिमेची सुंदर सजावट करण्यात आली होती. मंदिराबाहेर उभारण्यात आलेल्या शामियान्यात श्रील प्रभुपादांच्या मूर्तीभोवती आरास करण्यात आली होती.
संकर्षण प्रभू, मदन गोविंद प्रभू, पांडुरंग हरी प्रभू, गोलोकचंद प्रभू, गिरीवर प्रभू, नारायण गौरांग प्रसाद, महाअवतार प्रभू, सुदर्शन प्रभू, विनोद गोपाल प्रभू, गोपाल चंद्र प्रभू, परशुराम खांडेकर प्रभू, भावग्रही जनार्दन प्रभू, श्री रामायण प्रभू, गौरांग प्रसाद प्रभू, पंकज राठी प्रभू, कुलदीप जैन प्रभू, प्रेम अमृत प्रभू याचबरोबर ललित कुंदमाताजी, हरिप्रिया सखी, वैशाली चव्हाण, ललिता राधा, प्रभावती गोपी, प्रिया रजरानी, सखी गौरांगी अशा एकंदर 52 जणांनी श्रील प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज म्हणाले की, आचार्य श्रील प्रभुपाद यांनी आपल्याला रत्नांची खाण दिलेली आहे, जीची गणना करणे कठीण आहे. त्यांनी आपल्याला ग्रंथरत्न, लीलारत्न, रूप रत्न, विग्रह रत्न अशा प्रकारची अनेक रत्ने बहाल केली आहेत. या रत्नांचा योग्य प्रकारे सांभाळ करून हा अनमोल ठेवा पुढील पिढीच्या हातात देणे आपले कर्तव्य आहे. आपण जर असे केले तर आपले जीवन सार्थक होईल. त्यानंतर भजन, कीर्तन आणि सर्वांसाठी महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. शनिवार व रविवारी हजारो भक्तांनी मंदिराला भेट देऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.









