पाकिस्तानचा संघ जाहीर : सलमान आगाकडे नेतृत्व
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रविवारी आशिया चषक आणि तिरंगी टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यीय संघात खराब फॉर्मशी झगडत असलेल्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना स्थान मिळालेले नाही. वेगवान गोलंदाज नसीम शाह पण संघाबाहेर आहे. सलमान आगाकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानचा समावेश भारत, ओमान आणि यूएईसोबत गट ‘अ’ मध्ये करण्यात आला आहे. पाकिस्तान आपला पहिला सामना 12 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध खेळणार असून 14 सप्टेंबरला भारताशी त्यांची लढत होईल.
आशिया कपपूर्वी पाकिस्तान 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान यूएईत होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेत खेळून सराव करणार आहे. ही मालिका अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि यूएई यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. यानंतर आशिया कप स्पर्धेचा थरारही यूएईमध्येच रंगणार आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही संघासाठी ही ट्राय सीरिज अनेक दृष्टीने फायदेशीर ठरु शकते.
बाबर, रिझवानला डच्चू
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे दोघेही डिसेंबर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून पाकिस्तानच्या टी-20 संघाबाहेर आहेत. आता, आगामी आशिया चषकासाठी पीसीबीने पाकिस्तानच्या टी 20 आणि वनडे टीममधून पत्ता कट केला आहे. पीसीबीने ट्राय सीरिज आणि आशिया कप स्पर्धा या दोन्ही मालिकांसाठी दोघांपैकी एकालाही संधी दिलेली नाही. विशेष म्हणजे, पाकिस्तानची 8 वर्षांनंतर आशिया कप स्पर्धेत बाबर आणि रिझवान या दोघांशिवाय खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे.
या स्पर्धेसाठी पीसीबीने अनुभवी खेळाडूंना बाहेर ठेवून युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. या संघात सलमान मिर्झा, सुफियान मुकीम आणि हसन नवाज यांना स्थान दिले आहे. पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पाक बोर्डाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. विंडीजविरुद्ध खेळताना हसन नवाजने दमदार कामगिरी केली होती. तर वरिष्ठ खेळाडू म्हणून हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी, फखर जमान यांना संघात स्थान दिले आहे तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मोहम्मद रिझवानऐवजी मोहम्मद हॅरीसची संघात वर्णी लागली आहे.
तिरंगी मालिका आणि आशिया चषकासाठी पाक टी 20 संघ – सलमान आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हॅरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहबजादा फरहान, सॅम आयूब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी आणि सुफियान मुकिम.









