वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
16 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत रायफल, पिस्तूल, शॉटगनमधून लक्ष्याचा वेध घेण्यास भारतीय नेमबाज सिद्ध झाले आहेत. 18 ऑगस्टपासून कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे 29 ऑगस्टपर्यंत चालणार असलेल्या या 12 दिवसांच्या स्पर्धेतील वरिष्ठ, कनिष्ठ आणि युवा श्रेणींमध्ये भारताचा 182 जणांचा मोठा संघ सहभागी होणार आहे.
भारतीय संघ हा स्पर्धेतील सर्वांत मोठा संघ असून एकूण पदकांसाठीच्या 58 स्पर्धांमध्ये ते भाग घेतील, ज्यामध्ये 46 वैयक्तिक स्पर्धा आणि 12 मिश्र सांघिक स्पर्धांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेतील प्रवेशिकांच्या संख्येनुसार, भारतीय नेमबाज सर्व 46 वैयक्तिक स्पर्धांमध्ये सांघिक पदकांसाठीही स्पर्धेत असतील. बहुतेक खेळाडू ऑलिंपिकमध्ये खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेतील, तर बरेच जण सेंटर-फायर, स्टँडर्ड आणि फ्री पिस्तूल, रायफलमध्ये प्रोन आणि शॉटगन प्रकारात डबल-ट्रॅपसारख्या ऑलिंपिकमध्ये समाविष्ट नसलेल्या स्पर्धांमध्येही उतरतील.
आशियाई अजिंक्यपद स्पर्धा ही बऱ्याच काळापासून खंडीय वर्चस्वासाठी लढाई राहिलेली आहे, ज्यामध्ये चीनला हरवण्याचा प्रयत्न राहणार आहे. गेल्या काही वर्षांत भारताने जागतिक स्तरावरही आघाडी घेतली आहे आणि पदकतालिकेत अव्वल स्थानासाठीची लढाई या दोघांमध्ये होण्याची शक्यता आहे. यजमान कझाकस्तान हा 111 खेळाडूंसह भारतानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा संघ आहे. याशिवाय कोरिया (70 खेळाडू), चीन (41), इराण (29), चिनी तैपेई (24) आणि व्हिएतनाम (20) यांनीही मजबूत संघ मैदानात उतरविले आहेत. मध्य पूर्वेतील नेमबाजांकडून, विशेषत: शॉटगन प्रकारात, जोरदार स्पर्धा अपेक्षित आहे.
चांगवॉन येथे झालेल्या मागील आशियाई स्पर्धेत भारताने एकूण 59 पदके (21 सुवर्ण, 22 रौप्य आणि 16 कांस्य) जिंकून चीनच्या मागे दुसरे स्थान पटकावले होते, तर दोहा येथे झालेल्या 14 व्या आशियाई स्पर्धेत भारताने चौथे स्थान पटकावले होते. तिन्ही विभागांमध्ये वैयक्तिक, सांघिक आणि मिश्र सांघिक स्वरूपात स्पर्धा आयोजित केल्या जातील.








