वृत्तसंस्था / बेगा (ऑस्ट्रेलिया)
रविवारी येथे झालेल्या एनएसडब्ल्यू बेगा खुल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत भारताची महिला स्क्वॅशपटू अनहात सिंगला दुखापतीमुळे संभाव्य जेतेपदाला मुकावे लागले. या स्पर्धेत इजिप्तच्या हबिबा हनीने जेतेपद पटकाविले.
17 वर्षीय अनहात सिंग आणि इजिप्तची द्वितीय मानांकीत हबिबा हनी यांच्यात झालेल्या अंतिम लढतीतील चौथ्या गेममध्ये अनहात सिंग 4-10 अशी पिछाडीवर असताना तिला दुखापतीमुळे खूपच वेदना सुरु झाल्या. काही क्षणातच या दुखापतीवर तात्पुरते प्रथमोपचार कोर्टवर करण्यात आले. पण वेदना अधिकच झाल्याने अनहात सिंगने अंतिम सामना अर्धवट सोडला. इजिप्तच्या हबिबाने हा सामना 9-11, 11-5, 11-8, 10-4 असा जिंकून विजेतेपद पटकाविले. या लढतीतील पहिला गेम अनहातने 11-9 असा जिंकला होता. त्यानंतर हबिबाने पुढील 2 गेम्स 11-5 व 11-8 असे जिंकून आघाडी घेतली होती. चौथा गेम 10-4 अशा स्थितीत असताना अनहातने माघार घेतली. अनहातने पहिल्यांदाच विश्व स्क्वॅश संघटनेच्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तिने उपांत्य सामन्यात इजिप्तच्या नूर खफग्याचा पराभव केला होता.









