सीमा वादासह इतर मुद्यांवर चर्चा अपेक्षित : एनएसए अजित डोवाल यांची भेट घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीमावादाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी चीनच्या परराष्ट्रमंत्री उद्या सोमवारी भारतात येणार आहे. केंद्र सरकारने त्यांच्या या दौऱ्याची पुष्टी दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निमंत्रणावरून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिटब्युरो सदस्य आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी 18-19 ऑगस्ट 2025 रोजी भारताला भेट देतील.’ असे जाहीर केले आहे. या दौऱ्यात वांग यी हे भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही करतील.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचा भारत दौरा हा भारत-चीन सीमावादावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमधील 24 व्या फेरीचा भाग असेल. चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी आणि भारतातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीला उपस्थित राहतील. या भेटीसंबंधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही माहिती देणारे निवेदन जारी केले. ‘सीपीसी केंद्रीय समितीच्या राजकीय ब्युरोचे सदस्य, परराष्ट्रमंत्री आणि चीन-भारत सीमा वादावरील चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान भारताला भेट देतील. भारतीय बाजूच्या निमंत्रणावरून सीमावादावर चीन आणि भारताच्या विशेष प्रतिनिधींमध्ये चर्चा होईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.









