बेळगाव : व्हीटीयूच्यावतीने एमबीए विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दीशा-वर्कशॉप टू डिकोड युवर एमबीए स्पेशिअलायजेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यशाळा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात पार पडली. यामध्ये 350 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. व्हीटीयूचे रजिस्ट्रार प्रा. टी. एन. श्रीनिवास म्हणाले, आपल्यातील कमकुवतपणा ओळखून त्यात पारंगत होण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करण्याची गरज असते. आयुष्यात आपल्याला अनेक संधी मिळतात. पण योग्य संधी साधून भविष्य उज्ज्वल करावे तसेच आपण कोणत्याही क्षेत्रात काम करताना त्यामध्ये विशेषज्ञता प्राप्त करून नावलौकिक करावे, असे सांगितले.
वित्त अधिकारी डॉ. प्रशांत नायक यांनी सरकारी क्षेत्रातील करिअर संधींबद्दल मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांची तयारी व यश मिळविण्यासाठी कशी वाटचाल करावी, याबाबत मार्गदर्शन केले. तृप्ती दीक्षित यांनी मानव संसाधन व्यवस्थापनाबाबत, विक्रांत खानोलकर मार्केटिंग व आंतरराष्ट्रीय व्यवसायातील कौशल्ये तर गीता गायकवाड यांनी मजबूत आर्थिक कौशल्ये व व्यापक बँकिंग कौशल्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. प्रल्हाद राठोड, डॉ. बसवराज कुडचीमठ, प्रा. उमेश भुशी, डॉ. दिप्ती शेट्टी, डॉ. विजयकुमार धानूर यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.









