कोल्हापूर / इम्रान गवंडी :
कोल्हापुरात होणाऱ्या सर्किट बेंचमुळे जिल्ह्याच्या कायदेशीर शैक्षणिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. विधी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांना अनेक संधी उपलब्ध होणार असुन सर्वच क्षेत्रातील व्यवसाय, रोजगाराला नवी दिशा देणारा काळ सुरू झाला आहे. कायद्याच्या नवसंशोधनाला चालना मिळणार आहे. विधी महाविद्यालयात गरजेनुसार डिप्लोमा व पदव्यूत्तर कोर्स वाढणार आहेत. सिनिअर वकीलांसोबत काम करण्याची संधी मिळणार असुन कोल्हापुरात ‘लॉ शिक्षण हब’चा उदय झाला आहे.
सर्किट बेंचमुळे कोल्हापूरला कायदेशीर शिक्षणाचे प्रमुख केंद्र बनण्याची संधी निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल आणि परराज्यातील विद्यार्थीही कोल्हापूरकडे आकर्षित होणार आहेत. कायदा (लॉ) क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांना मागणी वाढेणार आहे. स्थानिक महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये विधीचे नवीन पदवी, पदव्युत्तर शिक्षण व डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू होण्याच्यादृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे.
कायदेशीर संशोधन, कॉर्पोरेट कायदा, आणि सायबर कायदा याबाबत जनजागृती व शिक्षणाची दरवाजे खुली झाली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उच्च दर्जाचे कायदेशीर शिक्षण मिळेल. सर्किट बेंचमुळे शहरात कायद्याशी संबंधित प्रशिक्षण केंद्रे, कोचिंग सेंटर्स आणि संशोधन संस्था स्थापन होण्यासाठी नवी दिशा मिळाली आहे. कोल्हापुरातील मुलांना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आता परदेशात पेंवा इतर शहरात जाण्याची गरज भासणार नाही.
- संशोधन आणि नवसंशोधनाला चालना
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि सायबर सारख्या ऱ्ण् A+ मानांकन प्राप्त संस्थांना कायदा, प्रशासन, आणि सामाजिक शास्त्रांशी संबंधित संशोधन प्रकल्पांना गती मिळेल. सर्किट बेंचमुळे कायदेशीर संशोधनासाठी नवीन केंद्रे आणि लायब्ररी स्थापन होण्याची संधी निर्माण झाली आहे.
- शैक्षणिक हब म्हणून स्थान बळकट
सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे कायदेशीर व संबंधित क्षेत्रातील शिक्षणाला नवीन दिशा मिळाली आहे. कोल्हापूर केवळ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर न राहता, आधुनिक शिक्षणाचे केंद्र म्हणूनही उदयास येणार आहे. स्थानिक विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल व कोल्हापूर हे शिक्षण हब म्हणून आपले स्थान बळकट करेल.
- आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण
कोल्हापूर शहरात कायदेशीर क्षेत्रातील तज्ञांचा ओघ वाढणार आहे. यामुळे स्थानिक संस्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम आणि परदेशी विद्यापीठांशी सहकार्य करण्याची संधी मिळणार आहे.
- शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन
सर्किट बेंचमुळे कोर्ट स्पर्धा, कायदेशीर कार्यशाळा, आणि सेमिनार यांसारखे उपक्रम वाढतील. यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण आणि नेटवर्किंगच्या संधी मिळतील. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर मिळालेल्या सर्किटबेंचने नागराकांची मुंबई – पुण्याला हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
- कायदेशीर शैक्षणिक राजधानी
शैक्षणिक संस्थांच्या वाढीमुळे होस्टेल्स, ग्रंथालये, आणि इतर सुविधांना मागणी वाढेल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच, शिक्षण क्षेत्रातील या प्रगतीमुळे कोल्हापूर शहराची पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक राजधानी म्हणून ओळख वाढेल.
- रोजगाराच्या संधींमध्ये वाढ
सर्वांच्या लढ्याला यश येऊन कोल्हापुरात सर्कीट बेंच साकारणे ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्कीट बेंचच्या लढ्यात शहाजी लॉ कॉलेजचाही नेहमी सहभाग राहीला आहे. कायदेशीर शिक्षणाशी संबंधित डिप्लोमा, अभ्यासक्रम व संकुले वाढणार आहेत. लॉ विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, प्रशिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार आहे. कमी वेळेत व कमी खर्चात उच्च कायद्याच्या शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. कायदेशीर शैक्षणिक विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत.
-डॉ. प्रविण पाटील, प्राचार्य, शहाजी विधी महाविद्यालय








