कोल्हापूर / संतोष पाटील :
गणेशोत्सव ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा आधारस्तंभ असतो. सध्या उत्सवाचं रुपडंच बदल पाहत आहे. उत्सव परंपराच्ये प्रकाशातून बेशिस्तीच्या सावटाखाली जाण्याची भिती आहे. उत्सवाला इव्हेंटच्या शर्यतीत बदलल्याने ढोल-ताशांचा गजर, वाद्यांचा नाद, सामाजिक संदेशांनी सजलेले देखावे आणि सर्व वयोगटांचा उत्साही सहभाग हा आठवणीपुरताच राहतो की काय ? असा प्रश्न बुध्दीच्या देवतेपुढे सुरू असलेल्या बुध्दिहीन वागण्यामुळे पडतो आहे.
गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाच्या नावाखाली जे प्रकार सुरू झाले आहेत, त्याने अभिमानाऐवजी लाजिरवाणेपणा वाढवत आहे. लेझर लाईट्समुळे होणारे आरोग्याचे नुकसान, डीजेचा कानठळ्या बसवणारा दणदणाट, रात्रभर चालणारी अश्लील नृत्ये, द्विअर्थी देखावे, ब्लोअरमधनू उडणारा प्लास्टिकचा धुरळा, वाहतूक कोंडीही यादी इतकी लांब आहे की त्यात भक्तीभावाचा आणि सामाजिक संदेशाचा उल्लेख शोधावा लागतो. याला अपवाद म्हणून मोठ्या संख्येने सामाजिक झालर असणारी मंडळांची संख्याही मोठी आहे, हीच काय ती तुर्तास जमेची बाजू म्हणावी लागेल.
उत्सव हा उत्सहात आणि दणक्यातच साजरा झाला पाहिजे, याबाबत कुणारे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र उत्सवात काही अप्रवृत्तीचा शिरकाव झाल्यानेच प्रशासनाने बंदी, कायदे आणि दंड यांचा कडक पवित्रा घ्यावा लागला. पण उत्सवाचा खरा कायापालट फक्त कायद्याच्या धाकाने होणार नाही. कारण उत्सवाच्या पवित्रतेला धोका हा फक्त तांत्रिक किंवा कायदेशीर नाही तर तो मानसिक आहे. आपणच आपल्या उत्सवाला ‘इव्हेंट मॅनेजमेंट‘च्या शर्यतीत बदलले आहे. ‘जास्त आवाज, जास्त प्रकाश, जास्त दिखावा‘ म्हणजे जास्त भक्ती असे समजले जावू लागल्यानेच उत्सवातील सांस्कृतिक बाज हरपू लागला आहे.
- पर्यावरण उत्सवाची गरज
गणेशोत्सव हा परंपरेचा, संयमाचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. यातून समाजाला प्रेरणा मिळायला हवी. पण आपण देत आहोत ती ध्वनिप्रदूषण, प्रदूषण आणि बेशिस्तीची शिकवण. हे चित्र बदलायचे असेल, तर समस्त कोल्हापूकरांनी स्वत?हून पुढकार घेत, डीजे नको, लेझर नको, प्लास्टिक नको, पर्यावरणपूरक उत्सवाचा आग्रह धरण्याची गरज आहे. गणेशोत्सव हा देवाच्या साक्षीने, पण पर्यावरणाच्या आणि समाजाच्या हितासाठी साजरा केला तरच हा ‘बुद्धीच्या देवतेचा उत्सव‘ होईल. बुद्धीहीन वर्तनाची तमा न बाळगता नियमांचे पालन आणि परंपरेचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे. अन्यथा, उद्या आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडून माफी मागावी लागेल. नाही सुधारलो तर “बाप्पा, आम्ही तुमच्या नावाचा उत्सव बेशिस्तीच्या सावटाखाली बुडवला.“ अशी अपराधीभावनेनं प्रार्थना करण्याची वेळ येईल.
- बंधनांची धाकाची गरज काय लागली
मिरवणुकीत सहभागीं अंध होवू नयेत यासाठीच जिल्हा प्रशासनाने यंदा गणेशोत्सवात लेझर लाईटच्या वापरावर कठोर बंदी घातली आहे. गेल्या वर्षी तब्बल 300 मंडळांवर अशा कारवाया झाल्या होत्या. रात्रभर चालणारा डीजेचा दणदणाट आणि हिडीस नृत्यांवर बंधन आणण्यासाठीच रात्री बारा वाजता मिरवणूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. अनेक तरुण मंडळ गणेशोत्सवात सजीव देखावं सामाजिक प्रबोधन करणारे आहेत. पण यामध्ये व्दिअर्थी देखाव्यांची रेलचेल वाढू लागली आहे. गणेशोत्सवात ब्लोअरमधून उडवला जाणारा प्लास्टिक कागदाचा धुरळा हा पर्यावरणासाठी मोठा धोका ठरत आहे. प्लास्टिकच्या वस्तू, थर्माकॉल आणि इतर कचरा यामुळे शहराची स्वच्छता राखणेही प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे.
- रस्त्यांवरील मंडप आणि वाहतूक कोंडी
न्यायालयाने सार्वजानिक सुरक्षा धोक्यात आणण्राया या मंडळांना अभय देवू नये असे निर्देष सहा वर्षापूर्वीच दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देषानुसार बेकायदेशीर मंडपांवर मर्यादा येण्याची शक्यता लांबच उलट दिवसेंदिवस मंडपाकडून सर्वसामान्यांची आडवणूकच अधिक होत असल्याचे वास्तव आहे. विनापरवानगी मंडपांची नोंद ठेवून, वाहतूक आडवणूक आडवण्राया मंडपांना आत्पकालीन स्थिती घडल्यास यास सर्वस्वी या मंडळांना दोषी ठरविले जाणार आहे. पोलीस दप्तरी नोंदीनुसार शहरातील 945 गणेश उत्सव मंडळांपैकी 647 मंडळांनीच मागील वर्षी महापालिकेकडून रस्त्यात मंडप उभारणीसाठी रितसर परवानगी घेतली. लोकभावनेची कदर आणि राजकीय वरदहस्त यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते.








