बसेसच्या कमी संख्येमुळे चढाओढ : शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता
बेळगाव : युवापिढी ही देशाचे उज्ज्ल भविष्य आहे. मात्र याच भविष्याचे आयुष्य टांगणीला लागलेले असेल ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. शहरातील विद्यार्थ्यांना बसमधून धोकायदाकपणे प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत असून, विद्यार्थ्यांना बसच्या पायऱ्यांवर थांबून प्रवास करावा लागत आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
विद्यार्थी विविध भागातून शहरात शाळा, महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत असतात. मध्यवर्ती बसस्थानकातून बससंख्या कमी असल्याचे कारण सांगत बसेसही कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे दररोज शाळा, महाविद्यालयांना ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागत आहे. परिणामी बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून, प्रसंगी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिळेल त्या बसने जाण्यासाठी धडपड
परिवहन मंडळाकडून विविध मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या असल्या तरी त्यांची संख्या कमी आहे. यासाठी बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या व वेळेवर घरी जाण्यासाठी किंवा शिक्षणासाठी शहरात येण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यासाठी मोठी चढाओढ करावी लागते. कारण दुसरी बस कधी येणार याची शाश्वती नसल्याने विद्यार्थी मिळेल त्या बसने जाण्यासाठी धडपड करत असतात.
जादा बसेस सोडण्याची आवश्यकता
अशाच प्रकारे विद्यार्थ्यांचा जिवघेणा प्रवास सुरूच राहिला तर मोठा अपघात होऊन जीवितहानीचीही शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांसह किशोरवयीन मुलांना दररोज बसचाच आधार घ्यावा लागतो. यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. परिवहन विभागानेही जादा बसेस सोडण्याची आवश्यकता आहे. कारण याचा मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस आहे.









