वृत्तसंस्था/सेंट लुईस, अमेरिका
सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झमध्ये विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशसाठी दिवस फारसा उल्लेख राहिला नाही. कारण त्याने एक गेम गमावला आणि दोन लढतींत बरोबरी साधली, ज्यामुळे तो ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या या 10 खेळाडूंच्या स्पर्धेच्या गुणतालिकेत मध्यभागी पोहोचला आहे. चौथ्या फेरीत अमेरिकेच्या सॅम शँकलँडकडून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर गुकेशने फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह आणि उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हशी दोन बरोबरी साधल्या. दरम्यान, आघाडीवरील स्थान नाट्यामयरीत्या बदलले. कारण स्पर्धेतील सर्वोच्च क्रमांकाचा अमेरिकी खेळाडू फॅबियानो काऊआनाने फक्त एक बरोबरी स्वीकारली आणि दिवसाच्या शेवटच्या सामन्यात आघाडीवर असलेला आर्मेनियन-अमेरिकी बुद्धिबळपटू लेव्हॉन आरोनियनला पराभूत करून दोन गुणांची आघाडी घेतली. गुकेशप्रमाणेच आरोनियनला फक्त दोन गेममध्ये बरोबरी साधता आली आणि एक सामना त्याने गमावला.
रॅपिडमध्ये फक्त तीन फेऱ्या शिल्लक असताना काऊआना, ज्याचे 10 गुण झाले आहेत, तो या विभागात जिंकण्यास सज्ज झाला आहे असे दिसते. याचा अर्थ असा की, ब्लिट्झ विभागात मुसंडी मारण्यासाठी त्याला काही प्रमाणात फायदा होईल. ब्लिट्झमध्ये एकूण 18 फेऱ्या डबल राउंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येतील. आरोनियन अजूनही आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तो अमेरिकेच्या वेस्ली सोसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. सात गुणांसह वाचियर-लाग्रेव्ह जवळच असून तो चौथ्या स्थानावर आहे, तर गुकेश अमेरिकेचा आणखी एक खेळाडू लीनियर दुमिंगेझ पेरेझ, जो जन्मत: क्युबन आहे, त्याच्यासोबत पुढील स्थानावर आहे. उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह आणि व्हिएतनामचा लिम ले क्वांग पाच गुणांसह सातव्या स्थानावर आहेत आणि ग्रिगोरी ओपारिन आणखी दोन गुणांनी मागे आहे. या स्पर्धेत शेवटच्या क्रमांकावर सॅम शँकलँड आहे, ज्याने एकमेव धक्का गुकेशला दिला. त्यामुळे त्याला दोन गुण मिळाले.
पहिल्या फेरीत आरोनियनविऊद्ध पराभव पत्करल्यानंतर भारतीय खेळाडूने सलग दोन गेम जिंकण्याची चांगली कामगिरी केली होती, परंतु दुसऱ्या फेरीत मजबूत प्रतिस्पर्ध्याशी त्याचा सामना झाला. शँकलँडविऊद्ध गुकेशने गुंतागुंत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्याच्या अंगलट आले. कारण अमेरिकी खेळाडू त्याच्या चांगल्या रणनीतिक कौशल्यासाठी ओळखला जातो आणि मधल्या टप्प्यात त्याने चांगला खेळ केला. वाचियर-लाग्रेव्हविऊद्ध गुकेशने जास्त प्रयत्न केले नाहीत आणि बरोबरीवर समाधान मानले. अब्दुसत्तोरोव्हविऊद्धही त्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत आणि 60 चालींनंतर त्यांनी बरोबरीवर सामना सोडविला.









