अन्य काही दोषी अॅथलेट्सवरही ‘नाडा’ची बंदीची कारवाई
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत थाळीफेकचे सुवर्ण मिळविलेल्या गगनदीप सिंगसह अन्य काही अॅथलेट्सवर राष्ट्रीय उत्तेजकविरोधी एजन्सीने (नाडा) चारऐवजी तीन वर्षांची बंदी घातली आहे. त्यांच्यावर डोपिंगचे आरोप झाल्यानंतर 20 दिवसांच्या आत त्यांनी आपला गुन्हा मान्य केल्यानंतर त्यांच्या बंदी कालावधीत एका वर्षाची कपात करण्यात आली आहे. सेनादलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गगनदीप सिंगने गेल्या फेब्रुवारीत उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या थाळीफेकमध्ये 55.01 मीटर्सचे अंतर नोंदवत सुवर्णपदक पटकावले होते. नंतर तो उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
नाडाने उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेल्यावर केलेल्या ताज्या अपडेटनुसार, गगनदीप सिंगच्या बंदीचा कालावधी एका वर्षाने कमी करण्यात आला. उत्तेजकविरोधी नियमातील कलमानुसार ही कपात करण्यात आली आहे. गगनदीपचा बंदीचा कालावधी 19 फेब्रुवारीपासूनच सुरू झाला आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी चार वर्षांची बंदी घालण्यात येते. पण नाडाच्या नियमातील कलम 10.8 नुसार खेळाडूने आपला गुन्हा लवकर मान्य केल्यास त्याला शिक्षेत कपात दिली जाते. गगनदीपचे सुवर्णपदक आता काढून घेतले जाणार असून हरियाणाच्या निर्भय सिंगला ते देण्यात येईल. सचिन कुमार व जैनू कुमार तसेच ज्युडोका मोनिका चौधरी, नंदनी वत्स, पॅरा पॉवरलिफ्टर्स उमेशपाल सिंग, सॅम्युएल वनलालतनपुइया, वेटलिफ्टर कविंदर, कब•ाrपटू शुभम कुमार, मल्ल मुगली शर्मा, वुशू खेळाडू अमन व राहुल तोमर आणि एक अल्पवयीन मल्लाचा समावेश आहे.









