बाप्पांनी वरेण्य राजाला केलेला उपदेश आपण अभ्यासत आहोत. त्या उपदेशानुसार वागून राजाला मोक्ष मिळाला. आपणही त्यानुसार वागलो तर आपल्यालाही मोक्ष मिळेल. ह्या उपदेशाचा शेवटचा श्लोक असा आहे.
इति ते कथितो राजन्प्रसादाद्योग उत्तमऽ । सांगोपांगऽ सविस्तारोऽ नादिसिद्धो मया प्रिय ।। 35।। आपण तो अभ्यासत आहोत. बाप्पांनी राजाला केलेल्या उपदेशात अंगे उपांगे यासह, विस्तारयुक्त अनादिसिध्द योग सांगितला. बाप्पा म्हणाले, उत्तम योग नक्की कशाला म्हणतात इथून मी सुरवात केली होती आणि तो साधण्यासाठी काय काय करायला हवं ते ते सर्व मी तुला सविस्तर सांगितलं. प्रत्येक माणसाचा स्वभाव किंवा चित्तवृत्ती वेगवेगळी असल्याने प्रत्येकजण समोरची घटना त्याच्या तहाच्या स्वभावानुसार समजून घेऊन त्यावर प्रतिक्रिया देतो. विशेष म्हणजे समोर घडणारी एकच घटना अनेक लोक पहात असतात पण त्यावर होणाऱ्या प्रतिक्रिया ह्या प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असल्याने वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ रस्त्याने जाताना होणारा अपघात अनेकजण पाहतात. त्यावर प्रतिक्रिया म्हणून काहीजण लगेच धावत जाऊन अपघातातील व्यक्तींना मदत करू लागतात तर काहीजण नुसतेच बघत बसतात, अन्य काही नकोच इथं थांबायला अशा विचाराने सरळ पुढे निघून जातात तर काहींचा कल अपघातातील व्यक्तींची काही चीजवस्तू हाताला लागतीये का, हे पाहण्याकडे असतो. अशावेळी आपल्या हातून योग्य वर्तणूक व्हावी म्हणून आपल्या स्वभावाचे नीट निरीक्षण करून आपल्याकडून कुणाला त्रास होत नाही ना याची खातरजमा करता येते. अभ्यासाने आपली वर्तणूक बदलून ती इतरांना समाधानकारक कशी होईल हे ठरवता येते. याला स्वभावात योग्य ते बदल करणे असे म्हणतात. यात जर आपण यशस्वी झालो तर आपलं चित्त शांत होऊन आपल्याला आपलं मूळ स्रोत असलेल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होईल. पतंजल मुनींनी याला निरबीज अवस्थेतील समाधी असं म्हंटलेलं आहे. थोडक्यात मनात काही वेडेवाकडे विचार न येता जेव्हा मनुष्य सरळ विचाराने योग्य ती कृती करतो तेव्हा तो निरबीज अवस्थेतील समाधीत असतो. प्रपंचातील अडचणी, प्रारब्धानुसार वाट्याला आलेले भोग आणि इतरांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न होणे या गोष्टींमुळे मनुष्य वेडावाकडा विचार करत असतो. त्यामुळे त्याच्या हातून गैरवर्तन घडते. म्हणून श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंच, प्रारब्ध किंवा उपाधी यामुळे जो मनुष्य त्रासून जात नाही तो कायम समाधीत असतो. अशा मनुष्याला आत्मसाक्षात्कार होत असतो. बाप्पांच्या उपदेशानुसार जो वागेल तो निश्चितच सरळमार्गी होऊन शेवटी त्याचा उद्धार होईल. यालाच बाप्पा अनादिसिध्द योग म्हणतात. अनादि म्हणजे ज्याच्यावर काळाचा परिणाम होत नाही अशी गोष्ट. बाप्पांचा उपदेश अनादि असल्याने, काळ कोणताही असो त्यांच्या उपदेशानुसार जो वागेल त्याचा हा योग सिद्ध होऊन निश्चित उद्धार होईल.
बाप्पांच्या उपदेशानुसार जो वागेल त्याला निरबीज समाधी अवस्था प्राप्त होईल आणि त्यामुळे त्याला आत्मसाक्षात्कार होत राहील. त्याला प्रपंच, प्रारब्ध व उपाधी याप्रसंगी मनस्वास्थ्य लाभलेले असल्याने समाधी अवस्थेत राहता येऊन त्याचे समाधान टिकून राहील. हीच कैवल्यावस्था होय. ही प्राप्त करण्यासाठी ध्यानधारणा व समर्पणयुक्त कर्म, भक्ती, मंत्रतंत्र हे दोन मार्ग सांगितलेले आहेत. पहिल्या मार्गाने जाणे सामान्य माणसाला सहजी शक्य होत नाही कारण प्रपंचाबद्दल आवश्यक ती उदासीनता त्याच्या मनात चटकन येत नाही. अशी उदासीनता येण्यासाठी साधकाची पूर्वजन्मीच्या साधनेतून तयारी होत असते.
क्रमश:








