आळसंद / संग्राम कदम :
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी नुकतेच काढलेल्या परिपत्रकाने तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी सोसायट्यांचे सचिव अक्षरशः खडबडून जागे झाले. वाघाचीच डरकाळी ती. त्यात “केंद्र पुरस्कृत संगणकीकरण प्रकल्प” अंतर्गत डायनॅमिक डे एंड हे काम जिल्ह्यात फारच ढिम्म गतीने सुरू असल्याने सहकार आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्समधून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विभागीय सह. निबंधक, कोल्हापूर यांनी थेट आदेश दिला “ज्या संस्थांचे संगणकीकरण पूर्ण नाही, त्यांच्या कोणत्याही आर्थिक वा इतर प्रस्तावावर शिक्कामोर्तब नाही.” आणि सुरू झाला रात्रीचा खेळ. कारण दिवसा वेबसाईट कसलीच चालत नाही.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेक सचिवांच्या डोळ्यांतील झोप उडाली. बँकेच्या कडक आदेशाने “काम आटपून टाका नाहीतर कर्जाची दारे बंद!” असा स्पष्ट इशारा मिळाल्याने प्रत्येकाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. दिवसा सर्व्हरच्या “नेहमीच्या कटकटी” मुळे फाईली अडकून पडायच्या, म्हणून सचिवांनी ठरवले “सुट्टी, शनिवार, रविवार कसलीही पर्वा नाही, आता डोळ्यात तेल घालून रात्र जागवत बसायचं.”
आणि मग सुरू झाला एक नवा अध्याय. रात्री गावात वीज गेली तरी सचिवांच्या खोलीत संगणकाचा स्क्रीन चमकत होता. घरचे झोपलेले, बाहेर कुत्र्यांच भुंकणंही थांबलेलं… पण सचिव मात्र सर्व्हरच्या “गुड मॉर्निंग’ची वाट पाहत बसलेले. कधी कधी तर डायनॅमिक डे एंड हे पूर्ण करायला उशिरा रात्री तीन वाजले तरी स्क्रीनसमोरून उठायचे नाही. कारण, म्हणतात ना “लोखंड गरम असताना ठोकावं तर आकार घेतं”, तसंच सर्व्हर ऑन असताना कामाचा हात आखडता घेण्याचा प्रश्नच नव्हता.
नवख्या सचिवांना या सगळ्या प्रक्रियेचा अनुभव कमी. “हे बटण दाबायचं की ते?” या गोंधळात त्यांनी बराच वेळ घालवला. तर जुन्या पिढीतील मंडळींचा प्रश्न वेगळाच “हे काय आमच्या काळात नव्हतं!” म्हणत त्यांनी तांत्रिक ज्ञानाच्या अभावाशी झुंज दिली. काहीजणांना तर पासवर्ड टाकूनही लॉगिन न होणं म्हणजे लग्न ठरल्यावर वर मंडपात येत नाही, तसा धक्का बसला.
बँकेच्या परिपत्रकात स्पष्ट नमूद आहे की पुढे प्रत्येक प्रकारचे कर्जवाटप सिस्टीममधूनच करावे. त्यामुळे “पेनपेपरचा जमाना गेला” हे वास्तव आता सचिवांनी मनावर घेतले. काहींनी व्हॉट्सअॅप ऐवजी आता सर्व्हरची स्क्रीन उघडी ठेवणेच पसंत केले. जिल्ह्यातील अनेक सोसायटी सचिवांनी रात्र रात्र जागून, झोपेचा बळी देऊन, तेल-तूप वाचवून आणि रात्रीच्या दिव्याखाली डोळ्यात तेल घालून हे काम पूर्ण केलं. काम संपल्यावर सकाळी ऑफिसऎवजी घरातच चहा घेताना हळूच पुटपुटलं “वाघाच्या डरकाळीला नक्कीच कान दिले, पण आता झोप परत मिळणार का?” “डायनॅमिक डे एंड” पूर्ण झालं.. पण आता सचिवांना “डायनॅमिक डे स्टार्ट’साठी थोडी झोप मिळेल का, हा प्रश्नच आहे! संगणकीकरणानं रात्र जागली, वाघाच्या डरकाळीनं झोपेचं खोबरं झालं तरी एक मोठं काम घडलं म्हणून सचिव वाघांना धन्यवाद देत आहेत.
- चिडून काय उपयोग.. आदेश वाघाचा होता
सचिवांनी रात्रभर सोसायटीच्या खोलीत आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन काम चालू केले होते. तरीपण काम आवरतं न्हवते. रात्री नऊ वाजता येऊन सकाळी सहा वाजता घरी जायचे आणि पुन्हा सकाळी दहा वाजता कामावर यायचे असा त्यांचा आठ दिवस नित्य नियम कार्यक्रम चालू होता. काही सचिव या कामापायी फार चिडले होते. पण चिडून काही उपयोग होणार नाही कारण आदेश वाघाचा होता.








