गायत्रीने फॅनला ओढणीने गळफास लावून घेतल्याचे तिला दिसून आले
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय 21, रा. सांगलीवाडी, सांगली) असे तिचे नाव आहे. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, गायत्री रेळेकर ही शिवाजी विद्यापीठामध्ये भूगोल विभागात एमएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृहातील रूम नंबर 54 मध्ये इतर दोन मैत्रिणींसह ती राहत होती. शुक्रवारी ती सांगली येथे घरी गेली होती.
सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास ती वसतिगृहात परत आली होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तिची रुममेट आली. बराच वेळ गायत्रीने खोलीचा दरवाजा न उघडल्यामुळे तिने बाजूच्या खिडकीतून खोलीत डोकावून पाहिले. गायत्रीने फॅनला ओढणीने गळफास लावून घेतल्याचे तिला दिसून आले. इतर मैत्रिणींनी या घटनेची माहिती वसतिगृहाच्या अधीक्षक डॉ. मीना पोतदार यांना दिली. पोतदार यांनी तत्काळ राजारामपुरी पोलिसांशी संपर्क साधला.
काही वेळातच राजारामपुरी पोलीस पथक ठाण्याचे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह शेंडा पार्क येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. याची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
मैत्रिणींना अश्रू अनावर
गायत्री सोमवारी सकाळीच गावाहून परत आली होती. मात्र ती वर्गामध्ये गेली नव्हती. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गायत्रीला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहून तिच्या मैत्रिणींना मानसिक धक्का बसला. काही तरुणींना अश्रू अनावर झाले.








