नगरसेवक शंकर पाटील यांच्या आंदोलनाला यश : नागरिकांतून समाधान
बेळगाव : गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला असला तरीदेखील एलअँडटीकडून चरी बुजविण्यात आल्या नसल्याने नगरसेवक शंकर पाटील यांनी एलअँडटी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. 15 ऑगस्टपर्यंत चरी बुजविल्या जातील, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानुसार सोमवारपासून गवळी गल्लीसह काही ठिकाणच्या चरी खडी टाकून बुजविण्याचे काम एलअँडटीकडून हाती घेण्यात आले. एलअँडटी कंपनीकडून 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी शहर व उपनगरात खोदाईचे काम करून जलवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. जलवाहिनी घालण्यात आल्यानंतर चरीमध्ये केवळ माती ओढण्यात आली आहे. खरे तर चरीवर काँक्रीट, डांबर किंवा खडी टाकून त्यावर रोलर फिरविणे गरजेचे आहे. पण एलअँडटीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक ठिकाणी सदर चरी धोकादायक बनल्या आहेत. बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अकरा दिवस मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.
आश्वासनानुसार चरी बुजविण्यास प्रारंभ
लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीने चरी बुजवाव्यात, अशी मागणी नगरसेवक शंकर पाटील यांनी यापूर्वीच एलअँडटी व महापालिकेकडे केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करत चरी बुजविण्यात न आल्याने संतापलेल्या नगरसेवक शंकर पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी एलअँडटी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल होते. त्यावेळी 15 ऑगस्टपर्यंत चरी बुजविल्या जातील, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार चरी बुजविण्याचे काम हाती घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









