विहीर खचून चार वर्षे उलटली तरी दुरुस्तीकडे कानाडोळा
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला तरी महापालिकेला वडगाव येथील विसर्जन तलावाचा विसर पडला आहे. नाझर कॅम्प येथील विसर्जन तलावाच्या शेजारील विहीर खचल्याने या ठिकाणी मोठे भगदाड पडले असून विसर्जनादिवशी होणारी गर्दी पाहता मोठी दुर्घटना होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. शहापूर गणेशोत्सव महामंडळाने यापूर्वीही अनेकवेळा निवेदने देऊन वडगाव येथील विसर्जन तलावाचा प्रश्न उपस्थित केला आहे.
वडगावच्या नाझर कॅम्प येथे काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने विसर्जन तलाव बांधला. जवळपास विसर्जन तलाव नसल्याने वडगाव तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी येतात. परंतु, चार वर्षांपूर्वी विसर्जन तलावाच्या बाजूला असलेली विहीर अचानक खचली. तेव्हापासून दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
विसर्जनादिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते. रात्रीच्या वेळी काळोखात फटाक्यांच्या आवाजात विहीर खचल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे लहानमोठे अपघात घडत आहेत. मागील वर्षी काही मोजके पोलीस या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यापूर्वीच महापालिकेने विसर्जन तलावाच्या शेजारील विहिरीबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.
मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा
वडगाव परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन नाझर कॅम्प येथील विसर्जन तलावात केले जाते. परंतु, विसर्जन तलावाच्या शेजारील विहीर खचली असल्याने विसर्जनामध्ये अडथळे येत आहेत. मागील तीन वर्षांपासून आम्ही महानगरपालिकेकडे याबाबत पाठपुरावा करत आहोत. परंतु, अद्याप दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही.
– नेताजी जाधव (शहापूर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष)









