मागील दोन दशकांत प्रथमच मिळालेले यश, यजमान म्यानमारचा केला 1-0 असा पराभव
वृत्तसंस्था/ यांगून, म्यानमार
गट ‘ड’मधील रविवारी येथे झालेल्या पात्रता सामन्यात म्यानमारचा 1-0 असा पराभव करून भारताने दोन दशकांत पहिल्यांदाच एएफसी 20 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉलसाठी पात्रता मिळवली. पूजाने 27 व्या मिनिटाला थुवुन्ना स्टेडियमवर निर्णायक गोल केला. भारताने सात गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवले आणि थायलंडमध्ये होणाऱ्या 2026 च्या मुख्य स्पर्धेत प्रवेश केला.
पहिल्या सत्रात भारताने वर्चस्व गाजवले, तर दुसऱ्या सत्रामध्ये म्यानमारने कामगिरीवर नियंत्रण ठेवले. नेहा आणि सिबानी देवी नोंगमेईकापम यांनी तिसऱ्या मिनिटाला एकत्रितपणे म्यानमारला धोका निर्माण केला, पण तो गोल होऊ शकला नाही. यजमान संघाने मग काही प्रतिहल्ले सुरू केले आणि नवव्या मिनिटाला फॉरवर्ड सू सू खिन ही गोल करण्याच्या जवळ आली होती.
पूजाने अर्ध्या तासाच्या आधी भारताला आघाडी मिळवून दिली. तिने स्वत: प्रतिहल्ला सुरू केला आणि उजवीकडून क्रॉस केला. चेंडू सर्वांना टाळून विऊद्ध बाजूने असलेल्या नेहाला मिळाला. तिने टोकावर पोहोचण्यात यश मिळवले आणि चेंडू मागे फटकावला. पूजा, जी तोपर्यंत गोलजवळ पोहोचली गेली होती, तिला हालचाली करण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नव्हता. तरीही तिने तो चेंडू फटकावला. यामुळे भारतीय संघाला मोलाचा दिलासा मिळाला. त्यानंतर भारतीय संघाने चेंडूवर नियंत्रण राखले आणि मध्यांतरापर्यंत ही छोटीशी आघाडी टिकविली.
दुसरे सत्र पूर्णपणे वेगळे होते. घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याने उत्साहित होऊन म्यानमारने जोरदार सुऊवात केली आणि भारताची गोलकीपर मोनालिसा देवीला 48 व्या मिनिटाला सू सू खिनचा प्रयत्न निष्फळ ठरविण्यासाठी अप्रतिम पद्धतीने चेंडू अडवावा लागला. भारताने म्यानमारच्या हल्ल्यांच्या लाटेला तोंड देत खूप मेहनत घेतली. मागील दोन सामन्यांमध्ये एकही गोल न स्वीकारणारी मोनालिसा घड्याळात 10 मिनिटे शिल्लक असतानाच मैदानात उतरली. यावेळी म्यानमारची पर्यायी खेळाडू मो प्विंट फ्यू हिने एई थेट फ्योने पाठवलेला हेड क्रॉस सरळ दिशेने फटकावला. पण भारताच्या गोलकीपरने उडी मारून चेंडू सुरक्षित ठिकाणी पाठविला.
फ्यूचा प्रयत्न पुन्हा एकदा 90 व्या मिनिटाला वाया गेला. तिचा फटका शुभांगीला आदळून् वळला आणि तो मैदानाबाहेर गेला. काही सेकंदांनंतर भारताने एक जोरदार प्रतिहल्ला चढविला. यावेळी सिबानीने सुलंजना राऊलला क्रॉस पाठवला आणि तिचा हेडर आडव्या खांबावर आदळला. यजमानांच्या सर्व दबावाला न जुमानता भारताने आघाडी कायम ठेवली आणि 2006 नंतर पहिल्यांदाच मुख्य स्पर्धेची पात्रता मिळवली.









