वृत्तसंस्था/ बँकॉक
भारताच्या युवा महिला बॉक्सर निशा व मुस्कान यांनी येथे झालेल्या यू-19 आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके पटकावली तर राहुल कुंडूने पुरुष विभागात जेतेपद पटकावले. भारताने या स्पर्धेत एकूण 14 पदकांची कमाई केली, त्यात तीन सुवर्णांसह 7 रौप्य व 4 कांस्यपदकांचाही समावेश आहे.
यू-19 विभागात सहभागी झालेल्या 10 पैकी 9 महिलांनी पदके पटकावली, त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य, 2 कांस्यपदके आहेत. कझाकस्तान, उझ्बेकिस्तान, चीन यासारख्या बलाढ्या बॉक्सर्सचा समावेश असलेल्या खेळाडूंविरुद्ध भारताने शानदार प्रदर्शन करीत आपली ताकद दाखवून दिली. निशाने महिलांच्या 54 किलो वजन गटातील अंतिम लढतीच्या तिसऱ्या व अंतिम फेरीत जोरदार प्रदर्शन करीत चीनच्या सिरुइ यांगवर 4-1 अशा फरकाने विजय नोंदवला तर 57 किलो गटात मुस्कानने आक्रमक धोरण स्वीकारत कझाकच्या आयाझान एरमेकचे कडवे आव्हान 3-2 अशा फरकाने परतावून लावत सुवर्ण मिळविले.
75 किलो गटात आरती कुमारीला चीनच्या टाँगटाँग जुकडून पराभवर स्वीकारावा लागला तर 80 किलो वजन गटात कृतिका वासनला कझाकच्या कुराले येगिनबायकीझीकडून 2-3 असा निसटता पराभव पत्करावा लागला. याशिवाय 80 किलोवरील गटात प्राची टोकासही उझ्बेकच्या सोबिराखोन शाखोबिडिनोव्हाकडून याच फरकाने पराभूत झाली तर 60 किलो गटाच्या अंतिम फेरीत विनीला उझ्बेकच्या सेवारा मामाटोव्हाने हरविले. जपानच्या अरिंदा अकिमोटोने निशावर 65 किलो गटात 4-1 अशी मात केली. 51 किलो गटात याशिका, 70 किलो गटात आकांक्षा फलस्वाल यांनी कांस्यपदके मिळविली.
पुरुष विभागात राहुल कुंडूने 75 किलो गटाच्या अंतिम लढतीत उझ्बेकच्या मुहम्मदजॉन याकुपबोएव्हेकवर 4-1 अशी मात करीत सुवर्ण घेतले. 65 किलो गटाच्या अंतिम लढतीत मात्र मौसम सुहागला उझ्बेकच्या जाखोन्गिर झेनिदिनोव्हाकडून, तर हेमंत सांगवानला कझाकच्या रसुल असान्खानोव्हकडून पराभव स्वीकारावा लागला. 55 किलो गटात शिवम व 85 किलो गटात गौरव यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
याचवेळी सुरू असलेल्या यू-22 विभागात भारताचे पाच बॉक्सर्सनी अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेसाठी भारताने यू-19 व यू-22 या दोन्ही विभागात मिळून 40 सदस्य पाठविले आहेत.









