कोलकाता/ वृत्तसंस्था
ड्युरँड चषक राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेत कोलकात्याच्या बलाढ्या मोहन बागान संघाने डायमंड हार्बर एफसी संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेत ब गटातील झालेल्या या सामन्यात बागानने डायमंड हार्बरचा 5-1 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले. या लढतीमध्ये डायमंड हार्बरचे खाते चौथ्याच मिनिटाला अनिरुद्ध थापाने उघडल्यानंतर पाचव्या मिनिटाला लुका मॅजेसेनने शानदार गोल करून बागानला बरोबरी साधून दिली. त्यानंतर बागान संघातर्फे जेमी मॅक्लारेन, लिस्टन कुलासो, सेहल अब्दुल समद आणि जेसन कमिंग्ज यांनी प्रत्येकी एक गोल करून डायमंड हार्बरचे आव्हान संपुष्टात आणले. या विजयामुळे बागान संघाने ब गटात आघाडीचे स्थान घेत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले. बागानने या सामन्यात मध्यंतरापर्यंत डायमंड हार्बरवर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. बागानने खेळाच्या उत्तरार्धात आणखी 3 गोल केले. पण डायमंड हार्बरला या कालावधीत गोल करता आला नाही. बागानच्या भक्कम बचावफळीमुळे डायमंड हार्बरला केवळ एकमेव गोल नोंदवता आला.
…









