वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नियमांचे आणि प्रक्रियांचे योग्य पालन न केल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 334 नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. या राजकीय पक्षांनी गेल्या सहा वर्षांमध्ये देशभरात एकही निवडणूक लढविलेली नाही. याचाच अर्थ त्यांनी नियमभंग केला आहे. तसेच, या पक्षांच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा पत्ता लागत नाही. हे पक्ष केवळ नोंदणी झालेले आहेत. तथापि, त्यांनी कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही. आपले हिशेब सादर केलेले नाहीत. निवडणूक आयोगाशी कोणताही संपर्क केलेला नाही. निवडणूक आयोगाने या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तथापि, असे पदाधिकारी अस्तित्वात असल्याचेही पुरावे आयोगाला सापडू शकले नाहीत. आयोगाने पाठविलेल्या कोणत्याही नोटीसीला किंवा पत्राला या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून उत्तरे आलेली नाहीत. या सर्व आधारांवर त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता नोंदणीकृत पण अमान्यताप्र्राप्त अशा 2 हजार 854 राजकीय पक्षांपैकी 2 हजार 520 पक्ष राहिलेले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









