वेगवान प्रवासाचा बेळगावकरांना मिळणार लाभ : आठवड्यातील सहा दिवस सेवेत
बेळगाव : बहुचर्चित बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस रविवारपासून धावणार आहे. पहिल्या दिवशी केवळ उद्घाटनासाठी एक्स्प्रेस धावणार असून सोमवारपासून आठवड्यातील सहा दिवस बेळगावकरांच्या सेवेत वंदे भारत उपलब्ध होईल. त्यामुळे आता बेळगावच्या प्रवाशांना बेळगाव-बेंगळूर असा वेगवान प्रवास करता येणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर रेल्वे बोर्डाकडून नुकतेच जाहीर करण्यात आले. एसी चेअर कारसाठी जेवणाविना 1264 रुपये, जेवणासह 1630, एक्झिक्युटिव्ह कोचसाठी जेवणाविना 2535, जेवणासह 2955 रुपये मोजावे लागणार आहे. हा तिकीट दर बेळगाव ते बेंगळूर रेल्वेस्थानकादरम्यान निश्चित करण्यात आला आहे. याबरोबरच हुबळी, हावेरी, दावणगेरे या रेल्वेस्थानकांसाठी स्वतंत्र दरनिश्चिती करण्यात आली आहे.
रविवार दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळूर रेल्वेस्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ही एक्स्प्रेस बेळगावच्या दिशेने मार्गस्थ होईल. उद्घाटनासाठी त्या दिवशी एक्स्प्रेस वन वे चालविली जाणार आहे. त्यानंतर सोमवारपासून दिलेल्या वेळापत्रकानुसार वंदे भारत धावणार आहे. एकूण आठ डबे जोडले जाणार आहेत. त्यामध्ये चार मोटर कार्स, एक ट्रेलर कार, एक एक्झिक्युटिव्ह क्लास व दोन ड्रायव्हिंग टेलर कार असणार आहेत. त्यामुळे यापुढे बेळगावच्या प्रवाशांना वेगवान प्रवास करता येणार आहे.
एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता
सध्या धावत असलेल्या एक्स्प्रेसला बेंगळूरला पोहोचण्यासाठी दहा ते अकरा तास लागतात. बेळगाव-बेंगळूर सुपरफास्ट एक्स्प्रेस साडेनऊ तासात बेंगळूरला पोहोचते. परंतु, आता केवळ साडेआठ तासांमध्ये बेळगाव ते बेंगळूर असा वेगवान प्रवास करता येणार आहे. सकाळी बेळगावमधून निघून दुपारच्या जेवणासाठी प्रवासी बेंगळूरमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे या एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बेळगावमध्ये होणार जल्लोषात स्वागत
वंदे भारत एक्स्प्रेस रविवारी रात्री 8 वाजता बेळगावमध्ये दाखल होईल. बेळगावच्या नागरिकांच्यावतीने रेल्वे स्थानकावर रेल्वेचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. अनेक वर्षांच्या मागणीनंतर वंदे भारत बेळगावला मिळाल्याने जल्लोष केला जाणार आहे.









