सातारा :
तुमच्या मुलांना मंत्रालयातून आरोग्य विभागात नोकरी लावतो असे अमिष दाखवून दोन्ही मुलांसह इतर सात अशा नऊ जणांची सुमारे वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोन भामट्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यांच्याकडून आणखी फसवणुकीचे प्रकार झाले असण्याची शक्यता आहे.
वैजनाथ भालचंद्र आचफळ (रा. कापडगाव, ता. फलटण) यांनी दिलेला फिर्यादीनुसार संतोष सदाशिव सुतार (रा. सणबुर, ता. पाटण) आणि महेश गंगाराम बंदरे (रा. नवी मुंबई) या दोघांनी आमची मुंबईमध्ये मंत्रालयात ओळख आहे. आम्ही मंत्रालयातून तुमच्या दोन्ही मुलांना आरोग्य विभागात नोकरी लावतो अशी बतावणी करून आणखी कोणी पॅंडिडेट असतील तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांचेही काम करू असा विश्वास संपादन करून त्या दोघांनी दि. 10 मार्च 2020 ते जुलै 2023 दरम्यान मिलिंद वैजनाथ आचपळ, उमानंद वैजनाथ आचपळ, तसेच अजित किसन कचरे, राहुल बबन धायगुडे, सागर विठ्ठल पडळकर, साईराज शिवाजी वाघमोडे, सूर्यकांत निवृत्ती जाधव, शैलेश शिरीष क्षीरसागर, शुभम ज्ञानेश्वर कुंभार यांच्याकडून 20 लाख 25 हजार घेऊन नोकरी न लावता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष सदाशिव सुतार आणि महेश गंगाराम बंदरे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.








