रत्नागिरी :
नारळी पौर्णिमेचा सण जिह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर उत्साहात साजरा झाला. नारळी पौर्णिमा हा कोळी आणि मच्छीमार बांधवांसाठी वर्षातील सर्वात महत्वाचा सण असतो. या दिवशी दर्याला अर्थात समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारीच्या हंगामाचा श्रीगणेशा केला जातो. शुक्रवारी मांडवी किनाऱ्यावर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते मानाचा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला.
नारळी पौर्णिमेची ही पूजा खवळलेला समुद्र शांत करते, पावसाचा जोर ओसरतो आणि मच्छीमार पुन्हा मासेमारी सुरू करतात, अशी त्यांची श्रद्धा आहे. नारळी पौणिमेच्या निमित्ताने येथील मच्छीमार, कोळी बांधवांनी ‘आमच्या धन्याचे रक्षण कर आणि आमच्या बोटीत भरपूर मासळी येऊ दे’ असे समुद्राला गाऱ्हाणे घातले.

संपूर्ण कोकण किनारपट्टीवर नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला. जिह्यातील मांडवी, मिरकरवाडा, मिऱ्या, भाट्यो, काळबादेवी, गोळप, पूर्णगड, वरवडे, संगमेश्वर खाडीपट्टा यांसारख्या किनारपट्टी भागांमध्येही उत्साहात नारळी पौर्णिमेचा सण साजरा झाला. पारंपरिक गोडधोड पदार्थ, नाच-गाण्यांचा जल्लोष आणि विविध स्पर्धांनी वातावरण भारून टाकले होते. या पारंपरिक सोहळ्dयामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर उत्साहाचे अन् आनंदाचे वातावरण पसरले आहे.
समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा करण्याची कोकणातील मच्छीमार समाजाची अनेक वर्षांची ही पारंपरिक पद्धत यानिमित्ताने पहायला मिळते. संगमेश्वर खाडीपट्ट्यातील करजुवे गावातील मच्छीमार बांधवांनी ढोल-ताशांच्या गजरात्न्व पारंपरिक वेशभूषेत एकत्र येऊन खाडीत नारळ अर्पण केले. यावर्षीही गावातील सर्व मच्छीमार पारंपरिक वेशभूषेत एकत्र आले. डोक्यावर टोपी आणि पांढरा सदरा घालून ढोल-ताशांच्या निनादात त्यांनी खाडीकडे प्रस्थान केले. वाजत-गाजत मिरवणूक खाडीकिनारी पोहोचल्यावर विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमार बांधवांनी समुद्राला शांत राहण्याची विनंती केली. यानंतर एकमेकांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन त्यांनी आनंद व्यक्त केला.
- खवय्यांना आता ताजे मासे खाण्याचे वेध
शासनाच्या नियमाप्रमाणे जरी 1 ऑगस्टपासून मच्छीमारीचा प्रारंभ झाला असला तरी खऱ्या अर्थाने नारळी पौर्णिमेपासूनच मच्छीमारीचा शुभारंभ करण्यावर मच्छीमार भर देत आहेत. या नव्या हंगामातील मासेमारीसाठी गावी गेलेले खलाशीही आता परतले आहेत. त्यामुळे खवय्यांना आता ताजे मासे खाण्याचे वेध लागले आहेत.








