वृत्तसंस्था / टोरँटो
एटीपी टूरवरील येथे झालेल्या नॅशनल बँक खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या बेन शेल्टनने रशियाच्या कॅचेनोव्हचा पराभव करत एकेरीचे विजेतेपद पटकाविले.
चौथा मानांकीत 22 वर्षीय बेन शेल्टनने अंतिम सामन्यात रशियाच्या 11 व्या मानांकीत कॅरेन केचेनोव्हचा 6-7 (5-7), 6-4, 7-6 (7-3) असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. एटीपी टूरवरील 1000 दर्जाच्या मास्टर्स हार्डकोर्टवरील स्पर्धा जिंकणारा शेल्टन हा पहिला अमेरिकन टेनिसपटू आहे. 2023 च्या साली शेल्टनने टोकियोमध्ये हार्डकोर्टवरील स्पर्धा तसेच गेल्या वर्षी होस्टनमधील प्लेकोर्टवरील स्पर्धा जिंकली होती. आता एटीपटीच्या ताज्या मानांकन यादीत शेल्टन 6 व्या स्थानावर राहील.
अंतिम सामन्यान कॅचेनोव्हने टायब्रेकरमधील पहिला सेट जिंकून शेल्टनवर आघाडी घेतली होती. पण त्यानंतर शेल्टनने आपल्या अचूक सर्व्हिसच्या जोरावर पुढील दोन सेट्स जिंकून कॅचेनोव्हचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात शेल्टनने आपल्याच देशाच्या टेलर फ्रित्झचा 6-4, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. अंतिम सामन्यात शेल्टनने एकूण 16 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. 2023 साली इटलीच्या जेनिक सिनेरने टोरँटो स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेमध्ये स्पेनच्या अल्कारेझने आपला सहभाग दर्शविला नव्हता. टोरँटो स्पर्धेत ब्रिटनच्या ज्युलियन कॅश आणि लॉईड ग्लासपूल या जोडीने दुहेरीचे जेतेपद मिळविताना सॅलीसबेरी आणि स्कुपेस्की यांचा 6-3, 6-7 (5-7), 13-11 असा पराभव केला.









