आपल्या अगदी जवळच्या मित्राने किंवा नातेवाईकाने आपल्याला त्याच्या विवाहाचे निमंत्रणच दिले नाही, तर आपल्या वाईट वाटणे साहजिक आहे. पण तसा प्रसंग उद्भवलाच तर आपण अशा मित्रांवर किंवा नातेवाईकावर काहीकाळ चिडण्याखेरीज फारसे काही करु शकत नाही. कारण, विवाहाचे आमंत्रण न मिळणे ही काही फारशी गंभीर बाब म्हणता येणार नाही. सध्या ‘रेडिट’ नामक सोशल साईटवर पोस्ट करण्यात आलेल्या एका प्रसंगाची चर्चा होत आहे. ‘एन्टायटल्ड पीपल’ नामक एका युजरने हा किस्सा प्रसिद्ध केला आहे. या युजरची तिच्या एका सहकर्मचारी महिलेशी जुजबी ओळख होती. या युजरचा विवाह निश्चित झाल्यानंतर ‘मला विवाहासाठी आमंत्रण आहे काय’ असा प्रश्न तिने या युजरला विचारला. नाही असे उत्तर देण्यात आले. पण हे उत्तर या महिलेने चांगलेच मनाला लावून घेतले होते. निमंत्रण नसल्याने ती संतापली होती.
दुसऱ्या दिवशी कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्याने या युजरला बोलावून घेतले. या महिलेने तिच्या विरोधात तक्रार सादर केली आहे, अशी माहिती तिला मिळाली. आपल्याला जाणून बुजून आमंत्रित करण्यात आलेले नाही. तसेच ही युजर कार्यालयात वाईट वातावरण निर्माण करीत आहे, अशा स्वरुपाची ही तक्रार होती. या युजर महिलेने ज्येष्ठ अधिकाऱ्याला हे पटवून दिले, की हा विवाह समारंभ केवळ घरगुती स्वरुपाचा होता. त्याला कार्यालयातील कोणालाही बोलाविण्यात आले नव्हते. तथापि, ही तक्रार करणारी महिला हे विसरण्याच्या मन:स्थितीत नव्हती. तिला कसे राजी करायचे हा प्रश्न आता त्या ज्येष्ठ अधिकाऱ्याला पडला होता. पण त्याच्यासमोरही केवळ स्वत:च्या डोक्यावर हात मारुन घेण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. या प्रसंगावरुन असे दिसून येते की कित्येकदा आपल्याला आपली काहीही चूक नसतानाही आपल्या सहकाऱ्याच्या तऱ्हेवाईकपणाचा त्रास सहन करावा लागतो. वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आणि वेगवेगळ्या कारणांसाठी असे घडत असते. अशावेळी संयम बाळगणे आणि आणि स्वत: दुसऱ्या कोणासंबंधात अशा प्रसंगांची पुनरावृत्ती न करणे, हेच उपाय असतात. सध्या इंटरनेटवर या प्रसंगाची चर्चा होत असून अनेक लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच अनेकांनी त्यांचे अशा प्रकारचे अनुभवही मांडले असून ते कसे हाताळायचे यावर आपली मते व्यक्त केली आहेत.









