शेतीकामे सुरू असल्याने ग्रामस्थांत भीती : विपरित घटना घडल्यास वनखातेच जबाबदार
वार्ताहर/अगसगे
हंदिगनूर परिसरामध्ये वावरणाऱ्या बिबट्यासदृश प्राण्याचा शोध घेण्यास अरण्य खात्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्यासदृश प्राण्यामुळे ग्रामस्थांना काही धोका पोहोचल्यास याला काकती अरण्य खातेच जबाबदार असणार आहे अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे. रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी मध्यरात्री हंदिगनूर, कुदनूर फाट्यावरील नाल्याजवळ बिबट्या जात असल्याचे कारचालकाच्या निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली होती. याबाबत सविस्तर वृत्त तरुण भारतमधून दि. 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन काकती अरण्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पायांच्या ठस्यांची पाहणी करून गेले आहेत. मात्र हे ठसे कोणत्या प्राण्याचे आहेत. याचे निदान केले नाही. पाहिलेल्या कारचालकाने प्रत्यक्षदर्शी सांगितले आहे की, तो बिबट्याच आहे. मात्र अरण्य अधिकाऱ्यांनी पायाच्या ठशावरून तो कोणता प्राणी आहे याबाबत स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमात आहेत.
ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
हंदिगनूर, मन्नीकेरी, केदनूर, कुरिहाळ, बोडकेनट्टी ही गावे एकमेकाला लागूनच आहेत. त्यामुळे याचा धोका कोणत्याही गावच्या नागरिकांना पोहोचू शकतो. त्यासाठी ग्रामस्थांनी सतर्कतेने शेतवाडीमध्ये काम करणे गरजेचे आहे. सध्या भातरोप लावणे, भांगलण, कोळपणी, औषध फवारणी आदी कामे जोमात आहेत. शेतकऱ्यांनी सावध राहावे असे आवाहनही हंदिगनूर ग्रामस्थांनी केले आहे.
मनिकेरी गावच्या डोंगराकडे बिबट्या गेल्याचा संशय
हंदिगनूर गावाला लागूनच एक किलोमीटर अंतरावर मन्नीकेरी गाव आहे. या गावच्या उत्तरेकडे डोंगर परिसर आहे. या डोंगराकडे बिबट्या सुदृश प्राणी गेल्याचा संशय काही ग्रामस्थांचा व्यक्त केला आहे. अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिली आहे.
काकती अरण्य खात्याचे दुर्लक्ष
बिबट्यासदृश प्राणी या परिसरामध्ये वावरत आहे. मात्र काकती अरण्य खात्याचे अधिकारी केवळ एकदाच हंदिगनूर गावाला भेट देऊन गेले आहेत. त्यानंतर फिरकूनसुद्धा पाहिलेले नाही. विशेषता वन्य प्राणी पकडण्याचे एक पथक या परिसरामध्ये तैनात करणे गरजेचे आहे. परंतु अद्याप तसे काहीच केले नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या प्राण्यापासून एकाही ग्रामस्थाला इजा झाल्यास त्याला केवळ काकती अरण्य खातेच जबाबदार राहील असा इशारा या परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
बिबट्यासदृश प्राण्याचा रात्रीचा संचार
सध्या परिसरात गवत, झुडपे वाढली आहेत. या झुडपामध्ये दिवसभर हा प्राणी लपून बसत असून, रात्री अंधारात अन्नासाठी परिसरामध्ये भटकत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण हा प्राणी रात्रीच्यावेळेस रस्त्यावर दिसला होता.









