वृत्तसंस्था/नवी दिल्ली
स्कॉटलंडच्या पुरुष युवा क्रिकेट संघाने आयसीसीच्या 2026 साली होणाऱ्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे. येथे झालेल्या पात्र फेरीच्या शेवटच्या सामन्यात स्कॉटलंडने नेदरलँड्स 20 धावांनी पराभव केला. या पात्र फेरीच्या स्पर्धेतील सामन्यात स्कॉटलंडने एकही सामना गमविला नाही. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी यापूर्वी झिम्बाब्वे आणि नामीबिया या संघांनी आपली पात्रता सिद्ध केली असून आता स्कॉटलंड हा तिसरा पात्र ठरणारा संघ आहे. स्कॉटलंड आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात स्कॉटलंडचा डाव 238 धावांत आटोपला. त्यानंतर नेदरलँड्सने 217 धावांपर्यंत मजल मारल्याने स्कॉटलंडने हा सामना 20 धावांनी जिंकला. नेदरलँड्सची एकवेळ स्थिती 3 बाद 108 अशी होती.









