वायुदलाचे हेलिकॉप्टर कोसळले : एकूण 8 जणांचा दुर्घटनेत मृत्यू
वृत्तसंस्था/अकरा
आफ्रिकेतील देश घानामध्ये झालेल्या सैन्य हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे संरक्षण आणि पर्यावरण मंत्र्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. वायुदलाचे हेलिकॉप्टर देशाच्या दक्षिण हिस्स्यात एका जंगलात कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमधून दोन मंत्र्यांसह दोन वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. ही दुर्घटना घानामध्ये एक दशकापेक्षा अधिक काळात झालेल्या सर्वात भीषण हवाई दुर्घटनांपैकी एक आहे. हेलिकॉप्टरने गुरुवारी सकाळी राजधानी अकरा येथून उ•ाण केले होते आणि उत्तर-पश्चिम दिशेला असलेल्या अशांत क्षेत्रातील ओबुआसी येथील सोन्याच्या खाणीच्या दिशेने जात होते, परंतु काही वेळानंतर हे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झाले होते अशी माहिती घानाच्या सैन्याने दिली आहे.
या हेलिकॉप्टरचे अवशेष अंदासी भागात मिळाले आहेत. दुर्घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. दुर्घटनेत संरक्षणमंत्री एडवर्ड ओमान बोआमाह आणि पर्यावरणमंत्री इब्राहिम मुर्तला मुहम्मद यांच्यासोबत सत्तारुढ पक्ष नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेसचे उपाध्यक्ष सॅम्युअल सरपोंग, वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुनुरु मोहम्मद आणि चालक दलाचे चार सदस्य मृत्युमुखी पडले आहेत. घाना सरकारने या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय शोक घोषित केला आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर झेड-9 प्रकारातील होते, ज्याचा वापर परिवहन आणि मेडिकल इर्मजन्सीसाठी केला जात होता. दुर्घटनास्थळावरुन एक मोबाइल फुटेज समोर आले आहे, ज्यात घनदाट जंगलात आग लागलेले हेलिकॉप्टरचे अवशेष दिसून येतात.









