अमेरिकेच्या आर्थिक आक्रमणापासून कुणीच सुरक्षित नाही : डॉ. इलाही
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50 टक्के आयातशुल्काच्या निर्णयाच्या विरोधात इराणने भारताला समर्थन दर्शविले आहे. अमेरिका अर्थव्यवस्थेला अस्त्राच्या स्वरुपात वापरत आहे. स्वत:च्या राष्ट्रीय हितांच्या रक्षणासाठी उभे ठाकणाऱ्या देशांवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आयातशुल्काचा वापर करत आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय केवळ भारताविषयी नाही, प्रत्यक्षात कुठलाही देश या आर्थिक हल्ल्यापासून सुरक्षित नसल्याचे इराणचे भारतातील राजदूत डॉ. इराज इलाही यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेचे शस्त्राrकरण अमेरिकेसाठी नवे नाही. मागील शतकादरम्यान अमेरिकेने स्वतंत्र राष्ट्रांच्या विरोधात आर्थिक दबावाला एक शक्तिशाली अस्त्राच्या स्वरुपात वापरले आहे. स्वत:च्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करू पाहणाऱ्या देशांना अमेरिकेने यापूर्वीही लक्ष्य केले असल्याचे डॉ. इलाही यांनी सांगितले आहे.
इराण याचा अनुभव
इराण 40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांना सामोरा जात आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या शासनकाळात आर्थिक निर्बंधांचा उघडपणे अन् गर्वाने वापर केला जात असल्याने चिंता वाढली आहे. ट्रम्प स्पष्टपणे आर्थिक दबावतंत्राला बळ पुरवत असून दुसऱ्या देशांना स्वत:च्या मर्जीनुसार वागण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे इतर देशांचे अधिकार आणि हितांसाठी कुठलाच आदर दाखवत नाहीत, असा आरोप डॉ. इलाही यांनी केला आहे.









