कोल्हापूर :
नांदणी येथील जैन मठाताली महादेवी उर्फ माधुरी हत्तीला वनतारा येथून परत आणण्यासाठी उभारलेला लढा समस्त कोल्हापूरकरांनी नेटाने लढलाही अन् जिंकलाही. बुधवारी वनताराने माधुरी हत्तीला परत करण्यास तयार असल्याचे सांगत कोल्हापूरकरांची माफी मागितली. तसेच हत्तीला परत करण्यासाठीच्या कायदेशीर पdिरक्रयेत राज्य सरकारला पाठींबा असल्याचेही स्पष्ट केले. लढवय्या कोल्हापुरकरांनी टोल आंदोलन, प्रतिवर्षी होणारे ऊस आंदोलन,कोल्हापूरी चप्पलासाठी प्राडा विरोधात उभारलेल्या लढ्या पाठोपाठ आता माधुरी हत्तीला नांदणी येथील मठात परत आणण्यासाठी उभारलेल्या लढ्यातून एकीचे बळ पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
पेटाने दिलेल्या तक्रारीनुसार उच्च न्यायालयाने नांदणी येथील जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्ती वनताराकडे सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जैन मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे वनताराच्या टीमने नांदणी येथून महादेवी हत्तीला घेवून जात वनतारामध्ये दाखल केले. यानंतर संतप्त झालेल्या नांदणीकरांनी वनतारा विरोधात आवाज उठवला. नांदणीकरांनी गावामध्ये ‘जिओ, रिलायन्स बॅन’ची मोहिम राबवली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्यानंतर नांदणीकरांनी उभारलेल्या लढ्याला लोकचळवळीचे स्वरुप आले. माधुरी हत्तीला परत आण्यासाठी जात, धर्म बाजूला ठेवत प्रत्येक कोल्हापूरकर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या लढ्यामध्ये उतरला अन् लढ्याल पाठबळ दिले.

- टोल आंदोलनात राज्य सरकारला झुकवले
शहरात आयआरबी कंपनीचे रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर आयआरबीकडून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली. मात्र या टोललाही कोल्हापूरकरांनी विरोध केला. टोल विरोधात कोल्हापुरात सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला. लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्यासह कोल्हापूरच्या जनतेने प्रदीर्घ काळ कोल्हापूरचा टोल घालविण्यासाठी आंदोलन केले. सुमारे दोन ते तीन वर्ष कोल्हापूरकरांनी दिलेल्या तीव्र लढ्यापुढे राज्य सरकारल झुकावे लागले होते. भाजप, शिवसेनेचे युती सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी टोल माफी दिली. त्यामुळे कोल्हापुरकरांनी आयआरबी टोल विरोधातील आंदोलनामधून लढवय्या बाणा दाखवून दिला होता.
- ऊस दरासाठी प्रतिवर्षी आंदोलन
उसाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रतिवर्षी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिवर्षी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले. सुमारे सोळा वर्षांपासून शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली उस दरासाठी लढा देत आहेत. प्रतिवर्षी होणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून अन्याया विरोधात लढा उभारण्याची ताकद शेतकरी बांधवांना मिळत आहेत.
- प्राडाला कोल्हापुरात येण्यास भाग पाडले
काहि दिवसांपूर्वीच प्राडाने त्यांच्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलेचा वापर करत फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलेचा कोठेही उल्लेख केला नाही. प्राडाच्या या भुमिकेमुळे नाराज झालेल्या कोल्हापुरकरांनी प्राडा विरोधातही सोशल मीडियावरुन आवाज उठवला होता. कित्येक दिवस प्राडा विरोधात सुरु असलेल्या या लढ्यातही सोशल मीडियावरच वॉर झाले. अन अखेर प्राडाच्या टीमलाही कोल्हापूर येण्यास भाग पडले. यावेळी प्राडानेही दिलगिरी व्यक्त केली होती. त्यामुळे जेंव्हा कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा कोल्हापूरकर तो लढा नेटाने लढतात अन् जिंकतातही.
- सर्किट बेंचसाठी चाळीस वर्ष लढा
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात होण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनसह कोल्हापूरकरांनी तब्बल चाळीस वर्ष लढा दिला. चार दशक लढ्यामध्ये सातत्य ठेवत अखेर कोल्हापूरकरांनी हा लढा देखील नुकताच जिंकला आहे. सोमवार 18 रोजी पासून सर्किट बेंच सुरु होत आहे.
- वनताराचे सीईओ दोन वेळा कोल्हापुरात
कोल्हापुरातील जनतेचा रोष पाहून वनताराचे सीईओ कोल्हापुरात आले. त्यांनी माधूरी हत्तीला आम्ही स्वत:हून ताब्यात घेतले नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेतले असल्याचे स्पष्टोक्ती दिली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेत माधूरी हत्तीला परत करण्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रीयेत आमचा पाठींबा असल्याचे सांगितले. बैठकीनंतर बुधवारी सायंकाळी वनताराचे सीईओ पुन्हा कोल्हापुरात आले व येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. कोल्हापूरकरांच्या तीव्र लढ्यामुळे वनताराचे सीईओ यांना देखील दोन वेळा कोल्हापुरात यावे लागले.








