सांगली / सुभाष वाघमोडे :
केंद्र आणि राज्य शासनाने एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हयातील १६ शासकीय आणि खासगी मिळून ७९ दवाखान्यांचा समावेश असून तब्बल ९९६ आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. गरजुंसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या योजनेकडे जिल्ह्यातील अनेकांनी दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहेत. जिल्हयात सुमारे साडे सत्तावीस लाख लोक या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र आत्तापर्यंत दहा लाख ५२ हजार लोकांनीच आरोग्याची हमी देणारे गोल्डन कार्ड काढले आहे. अद्याप १७ लाखांवर जणांनी हे कार्ड काढले नाही. ज्यांनी कार्ड काढले नाही त्यांनी तात्काळ हे कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) दोन जुलै २०१२ पासून प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये सुरू केली आणि नंतर ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली.
महत्त्वाकांक्षी योजना सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या कुटुबांसाठी सुरू करण्यात आली आणि नंतर वेळोवेळी इतर लाभार्थी गट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दि. २३ सप्टेंबर, २०१८ पासून भारत सरकारव्दारे लागू करण्यात आली.
या योजनेत समाविष्ट केलेली कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना २०११ च्या वंचित आणि व्यावसायिक निकषांवर आधारित होती. ही योजना २०१८ ते २०२० या दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात आली. योजनेकरिता येणाऱ्या खर्चामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा हिस्सा ६०:४० च्या प्रमाणात आहे. राबविण्यात येत असलेल्या एकत्रित योजनेत शासनाने दि. २६ फेब्रुवारी, २०१९ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या. त्यानुसार योजनेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.१.५० लक्ष रकमेचे विमा संरक्षण पुरविले जात होते.
तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य १२०९ योजनेमधून उपचारांसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.५.०० लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण लागू होते. योजना दि. १ एप्रिल २०२० ते दि. ३० जून २०२४ या कालावधीत राबविण्यात आली.
त्यानंतर महाराष्ट्र सरकारने दि. २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व कुटुंबांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आणि चालू योजनेची व्याप्ती वाढवली. त्यानुसार दि. १ जुलै २०२४ पासून विस्तारित कार्यक्षेत्रासह एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेत महाराष्ट्रातील सर्व लोकसंख्या समाविष्ट आहे. ही योजना अंगीकृत रुग्णालयांद्वारे रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या व्दितीय आणि तृतीय प्रकारच्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापासून ते सुट्टी होईपर्यंत रोखरहित दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करते. ही योजना हमी तत्त्वावर राबविण्यात येत आहे.
- एकत्रित योजने ठळक वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण अंगीकृत रुग्णालयांमध्ये रोख रक्कम रहीत व्दितीय व तृतीय प्रकारचे उपचार प्रति वर्ष रु. ५ लाखांचे आरोग्य संरक्षण कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात. रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या ३४ विशेष सेवांतर्गत शस्त्रक्रिया /उपचारांच्या वैद्यकीय सेवा, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय/खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देशभरात कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयात घेता येतो. योजनेसाठी समर्पित कॉल सेंटर जेथे लाभार्थी योजनेची माहिती मिळवू शकतात आणि योजनेअंतर्गत सेवांबद्दल तक्रार करू शकतात योजना पूर्णपणे कागदविरहीत व संगणक प्रणालीव्दारे राबविली जाते. लाभार्थ्यांना मदत आणि सहाय्य पुरविण्यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये आरोग्यमित्र नियुक्त केले आहेत.
- योजनेतील लाभार्थी
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (गट-अ) सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना, २०११ मध्ये नोंदविलेली कुटुंबे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा मधील समाविष्ट अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील कुटुंबे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
गट अ-पिवळी, केशरी, अंत्योदय अन्न योजना व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबे, गट ब शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे, कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेली परंतु महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्रधारक असलेली कुटुंबे, गट क-शासकीय/शासनमान्य अनाथाश्रमातील मुले, विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला, वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले कुटुंबातील सदस्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे (महाराष्ट्र राज्यातील बाहेरील रहीवासी असलेले) गट ड महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघातग्रस्त् झालेला महाराष्ट्र/भारताबाहेरील रुग्ण. गट इ महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यांतील ८६५ गावांतील केलेली शिधापत्रिकाधारक कुटुंबे.
- योजनेतील समाविष्ठ दवाखान्यांची नावे
आदित्य सांगली, आण्णासाहेब डांगे आष्टा, अनुराधा डोळयाचा दवाखाना सांगली, आरीन हॉ स्पिटल मिरज, आष्टा मल्टिस्पेशालिटी, बंडगर हारिपटल भिवघाट, भारती सांगली, चोपडे मेमोरियल सांगली, चौगुले हॉस्पिटल वाळवा, क्रिस्टल पंचा मल्टिस्पेशालिटी पलुस, देशमुख चॅरिटेबल, मरगाळे मल्टिस्पेशालिटी आटपाडी, गर्व्हमेंट मेडीलक हॉस्पिटल मिरज, गुरव हॉस्पिटल सांगली, कबाडे सर्जीकल सांगली, कमल आर्थोपेडीक सेंटर जत, कमला अॅक्सीडेंट पलूस, खंबाळकर सुपर स्पेशालिटी, कृष्णामाई मल्टिस्पेशालिटी वाळवा, कुल्लोळी सांगली, कुंभार अॅक्सीडेंट मिरज, लायन्स कल्ब आय मिरज, लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी मिरज, लाईफ केअर सुपर मल्टिस्पेशालिटी पलूस, मगदुम मल्टिस्पेशालिटी सांगली, महात्मा गांधी कॅन्सर मिरज, मेहता सांगली, नॉब आय सांगली, नंदादीप आय सांगली, नेप्टुयन ईएनटी मिरज, पार्वती न्यु लाईफ मल्टिस्पेशालिटी, पोरवाल इस्लामपूर, प्रगती हॉस्पिटल सांगली, सेवासदन, साई शिराळा, सिध्दिविनायक हॉस्पिटल खानापूर, विजयसिंहराजे पटवर्धन आय सांगली, उषकाल सांगली, वरद मल्टिस्पेशालिटी सांगली, विवेकानंद कुपवाड, वाळवेकर सांगली, सिनर्जी आदी हॉस्पिटलांचा समावेश आहे.








