बेळगाव : पावणे दोन वर्षापूर्वी यरगट्टी येथील एका प्रार्थनास्थळामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून महालिंगपूर, जि. बागलकोट येथील एका तरुणाला मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. तुफैलअहमद दादापीर नकारची (वय 22) राहणार महालिंगपूर असे त्याचे नाव आहे. हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पुनीत केरेहळ्ळी यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या एक्स खात्यावर सीसीटीव्ही फुटेजसह पावणे दोन वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणाला वाचा फोडली होती. अल्पवयीन मुलीचे वडील न्याय मागत आहेत. त्यांनी फिर्याद दाखल करू नये यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आहे. त्वरित संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
एक्स खात्यावरील या पोस्टची दखल घेत जिल्हा पोलीसप्रमुखांनी या प्रकरणाच्या तपासासाठी त्वरित तीन पथके स्थापन केली. मंगळवारी मध्यरात्री महालिंगपूर येथे तुफैलअहमदला अटक करण्यात आली असून तत्पूर्वी मुरगोड पोलीस स्थानकात त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता लागू होण्याआधीचा हा प्रकार आहे. त्यामुळे भारतीय दंड विधान व पोक्सो कायद्यांतर्गत त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलीसप्रमुखांनी सांगितले. 5 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ही घटना घडली आहे. यरगट्टी येथील एका प्रार्थनास्थळात अल्पवयीन मुलीला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना गंभीर आहे. तरीही समेट घडविण्यात आला होता. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे बालसंरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून स्थानिक अंगणवाडी कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुरगोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.









