कराड :
कराड शहरालगत एका विवाहितेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. विवाहितेकडे लग्न करण्याचा तगादा लावत तिने नकार दिल्याने संशयिताने तिच्या वडिलांची दुचाकी जाळली. शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्यावर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला आहे.
पीडितेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, आगाशिवनगर परिसरातील एका संशयिताने एप्रिल 2025 पासून सतत पाठलाग करून पीडितेला लग्नासाठी जबरदस्ती करत होता. मे 2025 मध्ये सायंकाळी साडेसातच्या त्याने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला.
दरम्यान, 4 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या काळात पीडितेच्या घराजवळील वडिलांच्या नावे असलेली लुना जाळण्यात आली. तसेच घराच्या बाहेर वाळत घातलेले कपडेही पेटवून देण्यात आले. शिवाय पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ व धमक्या देण्यात आल्या. लग्न केले नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी याप्रकरणी तात्काळ तपास यंत्रणा राबवत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांना संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. माळी यांच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.








