सायबर क्राईम विभागाकडून मूळ मालकांना परत
बेळगाव : गेल्या पाच महिन्यांत चोरीस गेलेले व हरवलेले 114 मोबाईल बेळगाव सायबर क्राईम विभागाने परत मिळवले आहेत. बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात सांकेतिकपणे दहा जणांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. सीईआयआर अॅपच्या माध्यमातून चोरीस गेलेले व हरवलेल्या मोबाईलबद्दल नागरिकांना तक्रार करता येते किंवा कर्नाटक राज्य पोलीस विभागाने सुरू केलेल्या ई-लॉस्ट या मोबाईल अॅप्लिकेशनवरही तक्रार दाखल करता येते, असे आयुक्तांनी सांगितले.
सीईआयआर अॅपवर तक्रार करा
मोबाईल हरवले किंवा चोरीस गेल्यानंतर सीईआयआर अॅप किंवा केएसपी ई-लॉस्ट अॅपवर तक्रार दाखल करावी. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलीस दलाला अनुकूल होणार आहे. सायबर क्राईम विभागाचे एसीपी जे. रघु व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या पाच महिन्यांत 114 मोबाईल शोधून दिले असून पुन्हा हे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.









