कराड :
कचरा टाकण्याच्या कारणावरून दोन कुटुंबातील वाद विकोपाला गेल्याची घटना बुधवारी कराड शहरातील लक्ष्मी हाइटस् मंगळवार पेठ येथे घडली. दोन्ही कुटुंबांकडून एकमेकांना मारहाण करण्यात आल्याची तसेच एकाने चाकू दाखवत धमकावल्याची परस्पर विरोधी तक्रार कराड शहर पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच दोन्ही कुटुंबांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विद्याधर दिनकर तारळेकर (वय 52) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सागर चंद्रकांत तारळेकर व रेखा चंद्रकांत तारळेकर यांनी कचऱ्यावरून बुधवारी सकाळी वाद घातला. वाद वाढत गेल्यावर त्यांच्या मुलाला व पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यातच सागर तारळेकरने खिशातून चाकू काढत तुला आणि तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, तारळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीच्या विरोधात समाधान चंद्रकांत तारळेकर यांनी फिर्याद दिली असून कचऱ्याच्या कारणावरून विद्याधर तारळेकर यांनी वाद घातला. तसेच सोहम आणि रुपाली तारळेकर यांनीही वाद घालून फिर्यादीच्या आईला शिवीगाळ दमदाटी केली, असे म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे यांनी दोन्ही कुटुंबांना कडक समज दिली असून त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.








