बेळगाव : राज्य सरकारने फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू केलेल्या ई-आस्थी नोंदणी मोहिमेत बेळगाव जिल्हा अव्वल ठरला आहे. ई-आस्थीअंतर्गत एकूण 5,14,513 मालमत्तांची नोंद झाली असून यापैकी बेळगाव जिल्ह्यातील 41,053 मालमत्तांचा समावेश आहे. त्यामुळे बेळगावने इतर जिल्ह्यांना मागे टाकले आहे. बेळगाव जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था ई-आस्थी नोंदणीमध्ये पुढे असल्यातरी बेळगाव महानगरपालिका मात्र पिछाडीवर आहे. ई-आस्थीअंतर्गत 24,957 मिळकतींना ए खाता तर 16,096 मिळकतींना बी खाता देण्यात आला आहे.
शहरी मालमत्ता व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-आस्थी योजनेमुळे महापालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे. ही सर्व प्रक्रिया डिजिटल असून त्याचा उद्देश राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये मॅन्युअल प्रक्रिया दूर करणे, त्रुटी कमी करणे आणि मालमत्ता करप्रणाली सुलभ करणे हा आहे. दररोज मालमत्तांची ई-आस्थी नोंदणी करण्यात बेळगावचे योगदान मोठे आहे. जुलै महिन्यात नवीन 52 मालमत्तांची ई-आस्थीअंतर्गत नोंदणी झाली आहे. म्हैसूरमध्ये 40,097 मालमत्तांची नोंदणी झाली असून यापैकी 26,999 मालमत्तांना ए खाता तर 13,098 मालमतांना बी खाता देण्यात आला आहे.
राज्यात एकूण 2,90,553 मालमतांना ए खाता, तर 2,23,980 मालमतांना बी खाता देण्यात आला आहे. ई-आस्थी नोंदणीची विशेष मोहीम 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ई-आस्थी नोंदणीत बेळगाव महापालिका अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत मागे आहे. बेळगाव जिल्ह्यातील 39 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी 19 नगरपंचायत, 16 नगरपरिषद, 2 नगरपालिका आणि 1 महानगरपालिका आहे. नगरपंचायती, नगरपरिषद आणि नगरपालिकांनी ई-आस्थीमध्ये प्रगती दर्शविली आहे. तथापि, बेळगाव शहर महापालिकेने 20 टक्क्यांपेक्षा कमी प्रगती दर्शविली आहे.










