वृत्तसंस्था/ मुंबई
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर आता भारतीय संघाचा टी-20 मोड सुरु होईल. तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक मध्ये आता संघ थेट मैदानात उतरेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत भारत पाकिस्तानशीही भिडणार आहे. यासाठी या महिन्याच्या अखेरीस संघाची घोषणा होऊ शकते. सूर्यकुमारकडेच नेतृत्वाची धुरा असणार असून संघात यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. दुसरीकडे, दुखापतीमुळे ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्या खेळण्याबाबत मात्र सांशकता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन यांनी व्यस्त वेळापत्रकामुळे मागील काही टी-20 सामने खेळले नव्हते, मात्र इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका पूर्ण केल्यानंतर आता त्यांच्याकडे एक महिन्याचा विश्रांती कालावधी आहे. या काळात ते पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज होऊ शकतात. यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शनची अनेक माजी खेळाडूंनी फलंदाजीची स्तुती केली होती. यामुळे साईची संघात वर्णी लागणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या उपलब्धतेवर सध्या प्रश्नचिन्ह आहे. संघ निवडण्यापूर्वी त्यांची फिटनेस टेस्ट होण्याची शक्यता आहे. यशस्वी, शुभमन आणि साई सुदर्शन हे तिघेही भारताच्या टॉप ऑर्डरसाठी महत्वाचे पर्याय ठरू शकतात, जे सामन्याच्या सुरुवातीलाच संघाला आघाडी मिळवून देऊ शकतात.
जैस्वाल, सॅमसन राहणार फोकस
इंग्लंड दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांचे स्थान पक्के मानले जात आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांच्यात मात्र चुरस होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात दोघांचीही कामगिरी सरस राहिली असून या निवड समिती कोणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरेल. दुसरीकडे, लोकेश राहुलची कामगिरी इंग्लंड दौऱ्यात शानदार राहिली आहे पण त्याचे टी 20 फॉरमॅटमध्ये खेळणे अवघडच आहे. यामुळे संघ व्यवस्थापनासमोर संजू सॅमसनचा पर्याय आहे. यष्टीरक्षक म्हणून प्रथम पंसतीचा खेळाडू असणार आहे. त्याच्यासह अभिषेक शर्माचेही स्थान पक्के मानले जात आहे. याशिवाय, अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याचा पर्याय निवड समितीकडे आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
सध्याच्या घडीला सर्वात मोठी समस्या म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची उपलब्धता. वेगवेगळ्या फॉरमॅटमधील कामाचा ताण लक्षात घेता दोन्ही गोलंदाजांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करण्यात आले आहे आणि निवड बैठकीपूर्वी त्यांचे फिटनेस मूल्यांकन होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, ऋषभ पंतही दुखापतीमुळे बाहेर असून तो आशिया चषकात खेळण्याची शक्यता कमी आहे.
भारताचा आशिया कपमधील सामने
10 सप्टेंबर : भारत विरुद्ध युएई दुबई (सायं. 7:30 वाजता)
14 सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई (सायं. 7:30 वाजता)
9 सप्टेंबर : भारत विरुद्ध ओमान अबू धाबी (सायं. 7:30 वाजता)
ग्रुप स्टेजनंतर दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील. यात भारत-पाकिस्तान सामना पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 28 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.
आशिया कप 2025 साठी भारताचा संभाव्य संघ –
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
आशिया चषकानंतर विंडीजविरुद्ध कसोटी मालिका
आशिया कपनंतर लगेचच, म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून, वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. तर आशिया कपचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी आहे. जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला, तर बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, भारतीय निवड समिती त्यानुसार निर्णय घेताना दिसेल.
आशिया चषकासाठी बांगलादेश संघाची घोषणा
ढाका : आशिया कप यंदा युएईमध्ये पार पडणार असून, यावेळी हा प्रतिष्ठेची स्पर्धा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 28 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान, आठ देशांच्या सहभाग असलेल्या या स्पर्धेपूर्वी बांगलादेशने आपला प्राथमिक संघ जाहीर केला आहे. संघाची धुरा नियमित कर्णधार लिटन दासकडेच सोपवण्यात आली आहे. 31 वर्षीय विकेटकीपर काजी नुरुल हसन सोहनची संघात पुनरागमन झाले असून, त्याने 2022 साली अखेरचा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
आशिया कप 2025 साठी बांगलादेशचा प्राथमिक संघ –
लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, मोहम्मद नईम शेख, सौम्या सरकार, मोहम्मद परवेझ हुसैन, ताहिद हृदोय, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, मोहम्मद शमीम होसेन, नजमुल हुसेन शांतो, रिशाद होसेन, मेहेदी हसन अहमद, मोहम्मद हसन, तनझिम हसन साकिब, मोहम्मद सैफुद्दीन, नाहिद राणा, मुस्तफिजुर रेहमान, शरीफुल इस्लाम, सय्यद खालेद अहमद, काझी नुरुल हसन, महिदुल इस्लाम भुईया अंकन, सैफ हसन.









