पित्याने तीन मुलींची केली हत्या
वृत्तसंस्था/ नमक्कल
तामिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्यातील वेप्पगौंडनपुथुर गावात एक खळबळजनक घटना घडली आहे. 36 वर्षीय इसमाने स्वत:च्या तीन अल्पवयीन मुलींची क्रूर हत्या केली आणि मग स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी त्याने स्वत:ची पत्नी आणि मुलाला वेगळ्या खोलीत कैद केले होते. या धक्कादायक घटनेमागील कारणही समोर आले आहे.
बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. आरोपीचे नाव एम. गोविंदराज असून त्याने प्रथम स्वत:च्या मुली प्रतीक्षाश्री (10 वर्षे), ऋतिकाश्री (7 वर्षे) आणि देवाश्री (6 वर्षे) यांची क्रूरपणे हत्या केली आणि मग स्वत:चा गळा कापून घेत आत्महत्या केली आहे.
गोविंदराजने स्वत:ची पत्नी भारती (26 वर्षे) आणि एक वर्षाचा मुलगा अग्नेश्वरनला एका दुसऱ्या खोलीत बंद केले होते. गोविंदराजने 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, या रकमेतून तो बोरवेल फर्म सुरू करत नवे घर निर्माण करू इच्छित होता, परंतु कर्ज फेडता न आल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे मानणे आहे. आर्थिक संकट अन् कर्ज फेडता ना आल्याने त्याने हे आत्मघाती पाऊल उचलले असावे असे पोलीस अधीक्षक एस. विमला यांनी सांगितले आहे.









