उत्तर प्रदेशचे खासदार विष्णुदत्त शर्मा खास दाखल : दीर्घकालीन मागणी झाली मान्य
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण देणारे विधेयक अखेर लोकसभेत संमत करण्यात आले आहे. त्यानिमित्त पणजीत भाजप कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना मिठाई भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी खास उत्तरप्रदेशहून लोकसभा खासदार विष्णुदत्त शर्मा गोव्यात दाखल झाले आहेत. कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. उपस्थितांमध्ये खास करून नरेंद्र सावईकर, कौस्तुभ पाटणेकर, सिद्धार्थ कुंकळकर, प्रभाकर गांवकर, बाबू कवळेकर, सर्वानंद भगत, विश्वास गांवकर, शांताराम नाईक, दया कारबोटकर, यांच्यासह सरचिटणीस, उपाध्यक्ष, राज्यभरातील मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, आणि शेकडो कार्यकर्ते, यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना दामू नाईक यांनी आजचा हा निर्णय ऐतिहासिक असून गोव्याची एक दीर्घकालीन मागणी मान्य झाली आहे त्याचा आम्हाला आनंद आहे, असे सांगितले. भाजपने कधीही कोणत्याही समाजामध्ये भेदभाव केलेला नाही. म्हणुनच आज सर्व जाती धर्मांचे लोक आमच्या सोबत आहेत. एसटी समाजाबद्दलच बोलायचे झाल्यास आज देशाच्या सर्वोच्चपदी अर्थात राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मूजी विराजमान आहेत तर गोव्यात सभापती म्हणून रमेश तवडकर आहेत. यावरून भाजपची भूमिका स्पष्ट झालेली असेल, असे ते पुढे म्हणाले. राजकीय राखीवता ही टक्केवारीवर आधारून असते.
त्यामुळे किमान चार तरी मतदारसंघ निश्चितपणे राखीव होतील, असा अंदाज दामू नाईक यांनी व्यक्त केला. येत्या विधानसभा निवडणुकीतच ही राखीवता लागू होणार याबद्दल दुमत नाही. तरीही अद्याप आपण विधेयक वाचलेले नाही. त्याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतरच पुढील माहिती देऊ शकेन असे ते म्हणाले. दरम्यान, शर्मा यांनी काँग्रेसने 50 वर्षे राज्य केले तरीही कधी आदिवासी मंत्रालय स्थापन केले नाही. ते काम भाजपने आणि खास करून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले. एवढेच नव्हे तर प्रत्येक वेळी भाजपने अनुसूचित जाती, जमातीचे विचार आत्मसात केले आहेत, त्यांचा सन्मान केला आहे, असे शर्मा म्हणाले. गोमंतकीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा राखीवतेचा विषय सोडविल्याबद्दल सर्वांनी केंद्र सरकार आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार व्यक्त केले.









