कोल्हापूर :
करवीरनगरीत छत्रपती राजाराम महाराज यांनी आबा गाडगीळ यांच्या अंगणाच्या पारड्यातील शिवलिंग आणून टाऊन हॉलमध्ये 1941 साली श्री कुक्कुटेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली. याची नोंद करवीर महात्म्यात आहे. नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून या शिवलिंगाची ओळख आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात पहाटे चार वाजल्यापासूनच अभिषेक आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.
करवीर महात्म्य साठाव्या अध्यायात करवीरपुत्र श्री कुक्कुटेश्वर अशी नोंद आहे. या शिवलिंगाला दहीभाताचे लिंपन करून अभिषेक घातल्यास भाविकांच्या इच्छा, अकांक्षा पूर्ण होतात. तसेच बोललेले नवसही पूर्ण होत असल्याने अनेक भाविक येथे नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यावर अभिषेक घालण्यासाठी येतात. काही भाविक तर गेल्या पन्नास वर्षापासून येथे दर्शनासाठी येत आहेत. यामध्ये जास्तीत जास्त व्यापाऱ्यांचा समावेश आहे. श्रावण सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून अभिषेक घालण्यासाठी गर्दी असते. टाऊन हॉलमध्ये श्री कुक्कुटेश्वर महादेव मंदिर असल्याने येथे उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
या मंदिरात पूजा अर्चा करण्याचा अधिकार छत्रपती राजाराम महाराज यांनी शंकरराव दत्तोबा शिंदे यांना दिला होता. त्यांच्या तिसऱ्या पिढीतील चंद्रकांत शंकरराव शिंदे सध्या पुजेची जबाबदारी सांभाळत आहेत. ते श्रावण सोमवारी प्रसाद म्हणून केळी, खिचडी वाटप करतात. तर महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा असते. दोन दिवस पूजा, भजनसह धार्मिक विधी केल्या जातात. तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते, हा महाप्रसाद घेण्यासाठी शेकडो भाविक येत असतात.
- स्वयंभू महादेव मंदिर अशी ओळख
श्री कुक्कुटेश्वर महादेव मंदिराची स्वयंभू मंदिर म्हणून ओळख आहे. येथे गाभाऱ्यात जावून दर्शन घेण्याचे भाग्य भाविकांना मिळते. त्यामुळे अनेक भाविक दररोज दर्शनासाठी येतात. तर श्रावण महिन्यातील सोमवारी अभिषेक घालतात.
- श्री कुक्कुटेश्वर महादेव मंदिराच्या स्थापनेसाठी 2 हजार 813 खर्च
छत्रपती राजाराम महाराज यांनी 1941 साली 2 हजार 813 रूपयांमध्ये श्री कुक्कुटेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली. तेव्हा करवीर इलाख्याचे पंचायतीचे प्रेसिडेंट मे. विश्वनाथ पाटील होते. हा संपूर्ण खर्च छत्रपती राजाराम महाराज यांनी केला होता.
- दुग्धाभिषेकाची परंपरा
श्री कुक्कुटेश्वर महादेव मंदिरात साध्या पध्दतीने दुग्धाभिषेक घातला जातो. तर उन्हाळ्यामध्ये पिंडीला दही भाताचे लिंपन करण्याची परंपरा आहे. या मंदिरात पहिल्यापासून दुग्धाभिषेकची परंपरा आहे, अशी माहिती येथील पुजारी शिंदे कुटुंबियांनी दिली.








