सिव्हिलसह विविध खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी : तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन
बेळगाव : हवामानातील बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. आजारपणामुळे मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यापासून ऊन, पाऊस आणि थंडी यासारख्या हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या विषाणूजन्य तापाची तीव्रता आता आणखी वाढली आहे. सर्दी, खोकला, थंडी ताप, डोळे लाल आणि पाणचट, डोके, चेहरा आणि हातपाय दुखणे, स्नायूदुखी, उलट्या आणि घसा खवखवणे यासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांची संख्या वाढली आहे. जरी हा गंभीर नसलेला विषाणूजन्य ताप असला तरी त्याचा अनेक दिवसांपासून लहान मुलांना त्रास होत आहे. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेतील बहुतांश मुले या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाने ताप, सर्दी आणि खोकला असलेल्या मुलांना घरी राहून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ओपीडी विभाग सर्दी आणि तापाच्या रुग्णांनी भरत आहेत. त्यातच गेल्या आठवड्यापासून सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडी विभागात दररोज 380 हून अधिक रुग्ण वैद्यकीय उपचार घेत आहेत. बरेच रुग्ण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी थेट मेडिकलमध्ये जाऊन स्वत:च औषधोपचार करत आहेत. काहीजण घरगुती उपचार घेत आहेत. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून मेडिकलमध्ये सर्दी आणि तापाच्या गोळ्या, सिरपची चांगली विक्री होत आहे. विषाणूजन्य ताप साधारणपणे 3 ते 5 दिवस राहतो. त्यावर उपचार घेतले नाहीत तर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. म्हणून आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. उबदार कपडे घालावेत, पौष्टिक अन्न सेवन करावे, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
ही खबरदारी घ्या…
- प्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांना विषाणूजन्य आजार येण्याची शक्यता जास्त असते. नवजात बालके आणि दहा वर्षांखालील मुलांना सर्दीपासून संरक्षण द्यावे. त्यांचे संपूर्ण शरीर झाकेल असे कपडे घालावेत. कान झाकणारी टोपी व हातमोजे घालावेत.
- मुलांना जेव्हा खाकला जास्त येतो तेव्हा वाफ द्यावी. थंड हवामानात नेब्युलायझरद्वारे वाफ देणे चांगले असते. संतुलित आहार घेतल्यास विषाणूजन्य आजार टाळता येतो.
- मुले शाळेतून घरी परतल्यानंतर त्यांना हात, पाय साबणाने धुण्याची सूचना करावी. पाणी साठविणारी भांडी वारंवार स्वच्छ करून वापरावीत.
- थंड अन्नाऐवजी गरम अन्न खावे. उकळलेले पाणी पिण्यासह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.









