खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने जांबोटीत जागृतीसह पत्रकांचेही वाटप
वार्ताहर/जांबोटी
कर्नाटक सरकारने बेळगावसह संपूर्ण सीमाभागात कन्नड सक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडीबरोबर मराठीमधूनही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावीत, तसेच सक्तीचे कानडीकरण थांबवावे या मागणीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी मराठी भाषिकांचा बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मराठी भाषिकांनी सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी, यासाठी मंगळवारी खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने जांबोटी येथे जागृती फेरीचे आयोजन करून पत्रकांचे वाटप करण्यात आले. मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार जांबोटी भागातील नागरिकांमधून व्यक्त करण्यात आला. बेळगावसह मराठी भाषिक बहुभाग 1956 पासून अन्यायाने कर्नाटकामध्ये डांबण्यात आला आहे.
15 टक्के पेक्षा जास्त संख्या असलेल्या भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून सरकारी परिपत्रके उपलब्ध करून देण्याचा कायदा असला तरी कर्नाटक सरकार सीमाभागात कन्नड सक्ती राबवित असल्यामुळे मराठी भाषा व संस्कृतीवर अन्याय होत आहे. त्यामुळे ही कन्नड सक्ती त्वरित थांबवून, मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतून व्यवहार करता यावा यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन म. ए. समिती पदाधिकाऱ्यांच्यावतीने नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन करण्यात आले. या जागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, म. ए. समितीचे नेते राजाराम देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर, माजी ता. पं. सदस्य पांडुरंग नाईक, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य वसंत नावलकर, रवींद्र शिंदे, बाबुराव भरणकर, राजू चिखलकर, विठ्ठल देसाई, रवींद्र देसाई, हणमंत जगताप, चंद्रकांत बैलूरकर यांच्यासह बहुसंख्य मराठी भाषिक सहभागी झाले होते.
सुळगा (हिं.) येथील नागरिकांकडून जागृती 
कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या कन्नड सक्तीविरोधात मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. त्यासंदर्भात सुळगा (हिंडलगा) येथील नागरिकांनी बैठक घेऊन गावात जागृती करण्यात आली. गावातील प्रमुख गल्लीतील नागरिकांना तसेच युवकांना मोर्चा संदर्भात माहिती देऊन मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच गावातील महिला मंडळातील सभासदांनादेखील मराठी भाषेचे महत्त्व सांगून मोठ्या संख्येने उपस्थित होण्यासाठी महिलांमध्ये जागृती करावी, असे सांगितले. या जागृती फेरीत महादेव कंग्राळकर (ग्रा. पं. सदस्य), परशराम पाटील, मल्लाप्पा पाटील, विलास देवगेकर, मारुती चौगुले, संजय पाटील, नारायण कदम (माजी ता. पं. सदस्य), मल्लाप्पा सावंत, बाळू हुंदरे, गणपत पोटे, लक्ष्मण निलजकर, अनिल हेगडे (हिंडलगा) यांचा समावेश होता.









