वृत्तसंस्था / सिनसिनॅटी
सर्बियाचा माजी टॉपसिडेड तसेच एटीपी मानांकनातील सहावा मानांकीत नोव्हॅक जोकोविचने येथे खेळविल्या जाणाऱ्या सिनसिनॅटी खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. सध्या टोरँटोमध्ये सुरू असलेल्या कॅनडा मास्टर्स टेनिस स्पर्धेतही जोकोविचने सहभागी न होण्याचा निर्णय दुखापतीमुळे घेतला होता.
आता चालु महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 24 ऑगस्टला सुरू होणाऱ्या 2025 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन खुल्या ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत जोकोविच सरावासाठीच्या स्पर्धेत न सहभागी होताना भाग घेणार आहे. एटीपी टूरवरील सिनसिनॅटी ही 1000 दर्जाची स्पर्धा आहे. 2023 साली या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचने स्पेनच्या कार्लोस अल्कारेझचा पराभव करत जेतेपद मिळविले होते. सिनसिनॅटी स्पर्धेत जोकोविचने आतापर्यंत 45 सामने जिंकले असून 12 सामने गमविले आहेत. 2025 च्या टेनिस हंगामात जोकोविचने 26 सामने जिंकले असून 9 सामने गमविले आहेत. गेल्या मे महिन्यात त्याने जिनीव्हातील स्पर्धा जिंकली होती. जोकोविच आता आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 25 वे ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. इटलीचा जेनिक सिनेर हा सिनसिनॅटी स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. तो येथे सोमवारी दाखल झाला आहे. सिनसिनॅटी टेनिस स्पर्धा येत्या गुरुवारपासून सुरू होणार असून या स्पर्धेत एकूण 96 खेळाडूंचा सहभाग राहील. ही स्पर्धा 18 ऑगस्टला संपणार आहे.









