वृत्तसंस्था / मॉंट्रियल (कॅनडा)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या 18 वर्षीय व्हिक्टोरिया मबोकोने स्पेनच्या मॅनिरोचा पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. आता मबोको आणि रायबाकिना यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होईल.
कॅनडाच्या मबोकोने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या जेसिका मॅनिरोचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले.या स्पर्धेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात मबोकोने अमेरिकेच्या टॉपसिडेड कोको गॉफचा केवळ 62 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला होता. या स्पर्धेत 2019 नंतर कॅनडाची सर्वात कमी वयाची मबोको ही पहिली टेनिसपटू ठरली आहे. 2015 साली बेलिंडा बेन्सिकने ही स्पर्धा कमी वयोमनात जिंकली होती.
दुसऱ्या एका सामन्यात इलिना रायबाकिनाने युक्रेनच्या कोस्ट्युकचा 6-1, 2-1 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. कझाकस्थानच्या नवव्या मानांकीत रायबाकिनाचा उपांत्य फेरीचा सामना मबोकोशी होणार आहे. हाताला झालेल्या दुखापतीमुळे कोस्ट्युकने हा सामना अर्धवट सोडल्याने रायबाकिनाला विजय म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेतील अंतिम सामना येत्या गुरुवारी खेळविला जाईल. तर सहावी सिडेड मॅडिसन किज, 16 वे मानांकीत क्लेरा टॉसन आणि जपानची माजी टॉपसिडेड नाओमी ओसाका तसेच दहाव्या मानांकीत इलिना स्वीटोलिना या सिडेड खेळाडूंचे आव्हान अद्याप जिवंत राहिले आहे.









