वृत्तसंस्था/ लंडन
पाचव्या व शेवटच्या कसोटीत मालिका बरोबरीत राखणारा रोमांचक व संस्मरणीय विजय मिळविल्यानंतर मोठा जल्लोष करण्याची भारतीय संघाला संधी होती. तशी मागणीही होत होती. पण संघातील सदस्यांनी शांतपणे सेलिब्रेशन करणे पसंत केले. ते मंगळवारी सकाळी तुकडी तुकडीने मायदेशी परतत आहेत.
एका दीर्घ व कठीण मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाट्यामय विजय मिळविल्यानंतर 24 तासाच्या आत मोहम्मद सिराजसह संघातील काही सदस्यांनी एमिरेट्सच्या विमानातून प्रवास केला. मंगळवारी सायंकाळी हे सदस्य दुबईमध्ये दाखल झाले आणि तेथून आपल्या शहराकडे जाणाऱ्या फ्लाईटमधून त्यांनी पुढील प्र्रवास सुरू केला. शेवटच्या सामन्याचा हिरो ठरलेला सिराज हैदराबादला जाणाऱ्या फ्लाईटमधून निघेल. अर्शदीप सिंग व शार्दुल ठाकुर मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंतील दोन सदस्य होते. काही खेळाडूंनी मायदेशात जाऊन ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रोमांचक सामना जिंकल्यानंतर सुमारे चार तासांतच अर्शदीप व प्रसिद्ध कृष्णासह संघातील काही सदस्यांनी लंडनमध्ये असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांसमवेत वेळ घालविला. अर्शदीपप्रमाणे कुलदीप यादवलाही या मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कुलदीप माजी खेळाडू पीयूष चावलासमवेत फिरताना दिसून आला. वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव जसप्रित बुमराह शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याला सामना सुरू असतानाच मायदेशी परतण्याची परवानगी देण्यात आली होती.
‘विजयानंतर सोमवारी रात्री फार मोठा जल्लोष करण्यात आला नाही. दीर्घ व भरगच्च मालिका असल्याने खेळाडूंनी स्वत:साठी किंवा कुटुंबियांसमवेत वेळ घालविणे पसंत केले. संघातील अनेक खेळाडू मायदेशी परतत आहेत तर काही खेळाडू अन्य ठिकाणी जाणार आहेत,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. रोहित शर्मा व विराट कोहली या हाय प्रोफाईल खेळाडूंनी निवृती घेतल्यानंतर कर्णधार गिल व त्याच्या अननुभवी संघाने ही संस्मरणीय ठरलेली मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवून फार मोठी कामगिरी केली आहे. या दोन सुपरस्टार्सच्या निवृत्तीला मागे टाकत संघाने पुढचा प्रवास सुरू केला आहे, असेच म्हणावे लागेल. भारताची यानंतरची मोठी मालिका पुढील महिन्यात होणार आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया चषक टी-20 स्पर्धा होणार असून भारत हा विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे.









