निज्जर समर्थकांनी सुरू केला खलिस्तानचा ‘दूतावास’
वृत्तसंस्था/ सरे
कॅनडामध्ये खलिस्तान समर्थकांची आगळीक नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या शासनकाळातही जारी आहे. सरे येथे खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या समर्थकांनी कथित स्वरुपात एक ‘दूतावास’ स्थापन केला आहे. खलिस्तान समर्थकांनी याला ‘एम्बेसी ऑफ द रिपब्लिक ऑफ खलिस्तान’ नाव दिले आहे.
हा दूतावास गुरुद्वाराच्या सामुदायिक केंद्राच्या एका हिस्स्यात स्थापन करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा या घटनाक्रमावर विशेष नजर ठेवून आहेत. कारण हे पाऊल प्रतिबंधित दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसकडून घोषित जनमत चाचणीपूर्वी समोर आले आहे.
हा प्रतिकात्मक दूतावास उघडपणे प्रतिबंधित दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचे समर्थन करत आहे. स्थानिक आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा खलिस्तान समर्थकांशी निगडित या घटनाक्रमावर बारकाईने नजर ठेवून आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या शासनकाळातही खलिस्तानी समर्थक कॅनडात भारतविरोधी कारवाया करत होते, यात वादगस्त परेड, मंदिरांवर हल्ले, तिरंग्याचा अवमान असे प्रकार सामील होते, परंतु कॅनडात नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या शासनकाळातही खलिस्तानी कारवाया सुरू राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गुरुद्वाराच्या प्रवेशद्वाराच्या कडेला खलिस्तान समर्थकांनी ‘रिपब्लिक ऑफ खलिस्तान’चा फलक लावला आहे. शीख फॉर जस्टिस या संघटनेवर भारत सरकारने बंदी घातली आहे. या संघटनेचे सदस्य हिंसक कारवायांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे. या संघटनेचे नेतृत्व फरार दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू करतो. पन्नू हा भारताच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्यं करत भारतात हिंसक कारवाया घडवून आणण्याची धमकी देत असतो.
सरे येथेच निज्जरची हत्या
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरातच खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची 18 जून 2023 रोजी हत्या झाली होती. 45 वर्षीय हरदीप हा कॅनडात शीख फॉर जस्टिसचा प्रमुख होता. निज्जरवर दोन चेहरे झाकून घेतलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात निज्जरचा मृत्यू झाला होता. याप्रकरणामुळे भारत आणि कॅनडाचे संबंध तणावपूर्ण झाले होते. कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ही हत्या भारत सरकारच्या हस्तकांनी घडवून आणल्याचा आरोप केला होता. तर भारताने त्यांचा हा आरोप फेटाळून लावला होता.









