मुंबई :
टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी भारतात इलेक्ट्रीक कार्सच्या चार्जिंगकरीता लागणारे आपले पहिले सुपर चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुलामध्ये कंपनीचे पहिले चार्जिंग केंद्र सुरु झाले आहे.
या केंद्रामध्ये चार वी-4 सुपर चार्जर (डीसी फास्ट चार्जर) आणि 4 डेस्टिनेशन चार्जरची (एसी चार्जर)सुविधा देण्यात आली आहे. सुपर चार्जर 250 केडब्ल्यू इतक्या वेगाने चार्ज करते. 14 मिनिटांमध्ये तीनशे किलोमीटर इतक्या मायलेजच्या गाडीचे चार्जिंग पूर्ण होते. सुपर चार्जिंगचा दर 24 रुपये प्रति केडब्ल्यूएच इतका असणार असून डेस्टिनेशन चार्जिंगचा दर 14 रुपये प्रति केडब्ल्यूएच इतका असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
8 चार्जिंग केंद्रे होणार
भारतामध्ये सुरुवातीला 8 सुपर चार्जिंग स्टेशन्स उघडण्याची योजना आहे. मुंबई सोबत दिल्लीतही ही केंद्रे उभारली जाणार आहेत. यानंतर पुणे, हैदराबाद आणि बेंगळूर सारख्या शहरांमध्ये ही स्टेशन्स सुरु करण्याची योजना आखली आहे.









