टीम इंडियाने अखेरचा पाचवा सामना जिंकून इंग्लंडविऊद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडविण्याची केलेली कामगिरी ऐतिहासिकच म्हटली पाहिजे. रोहित शर्मा, विराट कोहली व रवीचंद्रन अश्वीन यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंशिवाय खेळणारा भारताचा हा तुलनेत नवखा असलेला संघ फेव्हरिट असण्याचे कोणतेही कारण नव्हते. किंबहुना, कागदावरील ताकदीपेक्षा प्रॅक्टिकली खेळ आणि जिगर महत्त्वाची असते, हे भारतीय संघाने दाखवून दिले. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या तऊण तडफदार संघाचे कौतुक व अभिनंदन करायला हवे. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतरची शुभमनची ही पहिलीच मालिका. त्यात इंग्लंडचा हा दौरा सर्वार्थाने खडतर आणि फलंदाज व गोलंदाजांचा कस पाहणारा. तथापि, येथील अवघड खेळपट्ट्यांवर कसदार खेळ करत भारतीयांनी घडवलेले सांघिक खेळाचे दर्शन अविस्मरणीयच ठरावे. कर्णधार आणि फलंदाज म्हणून शुभमनने केलेली कामगिरी जबरदस्तच. पाच सामन्यांमध्ये 4 शतकांसह त्याने तडकवलेल्या 754 धावा त्याचा दर्जाच स्पष्ट करतो. या कामगिरीने मालिकेतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झालाच. किंबहुना, कर्णधार म्हणून कोणतेही दडपण न घेता मुक्तपणे खेळण्याची त्याची शैली विशेष ठरली. कर्णधार म्हणून त्याने काही सामन्यांमध्ये जरूर चुका केल्या असतील. पण, अशाच चुकांमधून कोणताही कर्णधार घडत असतो, हे लक्षात घ्यायला हवे. मुख्य म्हणजे ही शिकण्याची वृत्ती त्याच्यामध्ये दिसून आली. शेवटच्या अटीतटीच्या सामन्यात त्याने दाखवलेला संयम, शांतपणे रचलेली व्यूहरचना बघता भविष्यात त्याच्याकडून अधिकच्या अपेक्षा असतील. सलामीवीर यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल यांचे मालिकेतील योगदानही महत्त्वपूर्ण होय. यशस्वीच्या ऊपाने भारताला धडाकेबाज फलंदाज मिळाला असून, या मालिकेत त्याने ठोकलेली दोन शतकेही निर्णायक म्हणावी लागतील. राहुलचा खेळही लौकिकास साजेसा. त्याने दोन शतकांसह केलेल्या उपयुक्त खेळ्या महत्त्वपूर्णच. तसा इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव प्रामुख्याने त्याच्याच गाठीशी होता. त्यामुळे त्याचे मार्गदर्शन इतर खेळाडूंकरिताही मौलिक ठरल्याचे दिसून आले. तसे पाहिले, तर साई सुदर्शन व कऊण नायर यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु, त्यांच्याकडून भ्रमनिरास झाला, असेच म्हणावे लागेल. इतकी संधी देऊनही नायरकडून धावा न होणे हे ‘कऊण’च ठरावे. त्यामुळे या दोघांबाबत विशेषत: नायरबाबत पुनर्विचार करावा लागेल. ऋषभ पंत हा टी ट्वेंटी व वन डे स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. तथापि, त्याची कसोटीतील कामगिरी यापेक्षाही वरचढ असल्याचे दिसून येते. कसोटीमध्ये खेळताना पंत एका वेगळ्याच लयीत असतो, हे इंग्लंड दौऱ्यातही दिसून आले. दोन शतके व जायबंदी झाल्यानंतरही त्याने दाखवलेली जिद्द अफलातूनच. फलंदाजी, गोलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण. प्रत्येक टप्प्यावर 100 टक्के योगदान देण्यात सर रवींद्र जडेजाचा हात धरणे कठीणच. या मालिकेतही त्याने एक शतक व सहा अर्धशतकांसह धावांचा रतीब ओतला. याशिवाय गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही कसून प्रयत्न केले. वॉशिंग्टन सुंदरची कामगिरी नावाप्रमाणेच सुंदर म्हणता येईल. गोलंदाजीबरोबरच त्याने फलंदाजीमध्ये दाखवलेली चमक नजरेत भरते. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर तो ज्या पद्धतीने खेळला, ते पाहता उद्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहता येईल. जसप्रीत बुमराह, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या आपल्या वेगवान गोलंदाजांनी हम भी किससे कम नही, हेच दाखवून दिले. यातील सिराजची कामगिरी ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासात संस्मरणीय ठरावी, अशीच. शेवटच्या व मोक्याच्या कसोटी सामन्यात त्याने दाखवलेली चिकाटी एखाद्या महान योद्ध्यापेक्षा कमी नव्हती. आक्रमकता आणि शेवटपर्यंत हार न मानण्याची वृत्ती असलेला इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडून सिराजने स्वत:बरोबरच आपल्या संघालाही सिद्ध केले. या मालिकेत कोणतीही विश्रांती न घेता तो पाचही सामने खेळला. यादरम्यान त्याने तब्बल 185.3 षटके म्हणजेच 1113 चेंडू टाकले. त्यामध्ये त्याने 23 बळी घेत विक्रमी कामगिरीचीही नोंद केली. मुख्य म्हणजे शेवटच्या षटकातही त्याच्या गोलंदाजीचा वेग ताशी 145 पुढे होता. ही कामगिरी अदम्यच. तंदुऊस्ती आणि सातत्य काय असते, हेच सिराजने दाखवून दिले. भविष्यात भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे निश्चित पाहता येईल. आकाशदीपने एजबेस्टन कसोटीत 10 बळी घेत दाखवलेला झंझावातही भारीच. यापुढेही त्याला असेच सातत्य दाखवावे लागेल. बुमराह हे भारताचे वन डेमधील ब्रम्हास्त्र मानले जाते. कसोटीतही त्याने चांगली कामगिरी केली. मात्र, तंदुऊस्तीअभावी या फॉरमॅटमध्ये त्याला अद्याप मोठी मजल मारता आलेली नाही, हेही खरे. प्रसिद्ध कृष्णाने धावा बऱ्याच दिल्या. पण, मोक्याच्या क्षणी त्याने बळी घेतले, हीदेखील वस्तुस्थिती आहे. मात्र, भविष्यात प्रसिद्धला धावांवर नियंत्रण ठेवावे, एवढीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा असेल. 2018 नंतर भारताविऊद्ध एकही मालिका इंग्लंडला जिंकता आलेली नाही. घरच्या मैदानावर भारताला अस्मान दाखवण्यासाठी त्यांनी बरेच सायास केले. मात्र, भारताने तोडीस तोड खेळ केल्याने साहेबांचे मनसुबे उधळले गेले. भारताच्या यंग ब्रिगेडला आपला हा धडाका व सातत्य यापुढेही दाखवून द्यावे लागेल. आगामी काळात वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका यांच्यासारख्या संघाशी भारताला दोन हात करावे लागतील. याशिवाय आशिया कप, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय खेळाडूंचा कस लागेल. राहुल द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीर हे भारताचे प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत आहेत. गंभीर हेही अल्पावधीत चांगले सेट झालेले दिसतात. भारतीय क्रिकेटमध्ये टॅलेंटची कमी नाही. अनेक नवीन खेळाडूही संधीची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे यापुढे स्पर्धा अधिकच तीव्र होत जाणार आहे. हे बघता क्रिकेटपटूंना क्लास आणि परफॉर्मन्स या दोहोतही गती दाखवावी लागेल.
Previous Articleसत्यपाल मलिक यांचे निधन
Next Article न्यायालयाच्या कठोर इशाऱ्यानंतर संप मागे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








