बँक ऑफ इंडिया दोडामार्ग शाखेचा पुढाकार
दोडामार्ग – वार्ताहर
मोर्ले येथील शेतकरी कै. लक्ष्मण यशवंत गवस यांचा हत्तीच्या हल्ल्यात काही महिन्यांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस मुलगा विनोद लक्ष्मण गवस याला बँक ऑफ इंडिया शाखा दोडामार्ग यांच्या प्रयत्नांमुळे २ लाख रुपयांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा या अंतर्गत मंगळवारी दोडामार्ग शहराचे माजी नगरध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांच्या हस्ते देण्यात आला. याबाबतची अधिक माहिती अशी की, कै. लक्ष्मण गवस हे आपल्या शेतात जात असताना अचानक हत्ती येऊन हत्तीने हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. कै. लक्ष्मण गवस यांचे बँक ऑफ इंडिया शाखा दोडामार्ग याठिकाणी खाते होते. त्यांचा बँक ऑफ इंडिया मार्फत अपघाती निधन झाल्यास प्रधानमंत्री सुरक्षा विमा उतरविण्यात आला होता. त्यानुसार त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नव्याने दाखल झालेले शाखा व्यवस्थापक शरद पेडामकर, व विमा त्यांना मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणारे करनम नंदकिशोर यांच्यामुळे कै. लक्ष्मण गवस यांचे वारस असलेला मुलगा विनोद गवस यांस २ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. बँक ऑफ इंडिया शाखा दोडामार्गचे अधिकारी कर्मचारी यांचे विनोद यांच्याकडून आभार मानण्यात आले आहेत. यावेळी संतोष नानचे, नगरसेवक राजेश प्रसादी, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष सागर शिरसाट, शुभम गावडे, मतीरामा मूर्ती, अनिल टेकडे, समीर राऊत, वेंकडोथ नाईक, अक्षय कुमार, नम्रता देसाई, वनश्री गवस आदी उपस्थित होते.
विनोद याने मानले आभार…
यावेळी कै. लक्ष्मण गवस यांचा मुलगा विनोद गवस यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, दोडामार्ग शहराचे नगरसेवक संतोष नानचे यांनी आपल्याला ही विम्याची मदत मिळावी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन तसेच फोनद्वारे विचारपूस केली. तसेच बँक ऑफ इंडियाचे अधिकारी करनम नंदकिशोर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला ही विम्याची रक्कम लवकर मिळाली आहे. त्यामुळे नानचे व बँक ऑफ इंडियाचे आपण आभार मानतो असे विनोद गवस यांनी सांगितले. शिवाय बँक ऑफ इंडिया मार्फत केंद्र व राज्य सरकारचे अनेक उपक्रम, योजना राबविले जातात त्यांचा जास्तीत जास्त फायदा लोकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी नगरसेवक नानचे यांच्याकडून करण्यात आले.









